पुष्कळ माणसांना एक अनामिक भीती वाटत असते. ही भीती ते कोणापुढेही बोलून दाखवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या हृदयावर ताण पडतो, हृदय हलके होत जाते व पुढे हृदयविकाराने मनुष्य जातो. बऱ्याच लोकांंना याचे ज्ञान नसते. अनामिक भीती बोलायची कोणापुढे? बायको मुलांजवळ बोलता येत नाही. त्यांच्यापुढे जर असे भीतीदायक काही बोलले तर ते उगाच घाबरतील, संसार विस्कळीत होईल. म्हणून हे लोक मनातल्या मनात भीती दाबून ठेवतात, बाहेर बोलून दाखवत नाहीत, मनातल्या मनात कुढत जातात. अशा वेळी योग्य व्यक्तीकडे भीती बोलून दाखवावी, त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. ऐकणारी व्यक्ती अयोग्य असेल तर तर ती तुमच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊ शकेल.
माणसाच्या मागे जी एक प्रकारची अनामिक भीती असते ती योग्य व्यक्तीपुढे बोलून दाखवली जात नाही, तोवर मन मोकळे होऊ शकत नाही. तोवर मनावरचा भार हलका होत नाही. मन:शांती कशी मिळवावी, याचा मार्ग पुस्तकात मिळू शकेल, पण मन:शांतीचे समाधान सुख-दु:खाची वाटणी केल्याशिवाय मिळत नाही. अशा वेळेस आपल्या गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीचा आधार घ्यावा. किंवा अध्यात्ममार्गातील गुरुंचा उपदेश घ्यावा. जपजाप्य करावे. तरच मन:शांती मिळू शकेल.
सत्पुरुषांच्या संगतीने, त्यांच्या उपदेशाने तुमचे निश्चितच कल्याण होईल. सर्व भार ईश्वरावर सोडा, त्याचे अनुसंधान ठेवा. ती एक प्रभावी शक्ती आहे. रोज ब्रह्म मुहूर्तावर उठून ईश्वराचे स्मरण, चिंतन करा. मनावरचा ताण हलका होईल.
मनाला आधार निर्माण होण्यासाठी व शांतता मिळवण्यासाठी ईश्वराची उपासना करा. ईश्वराच्या उपासनेचे स्तोम करू नका. आपण उपासना करतो, ती दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, तर स्वत:च्या उन्नतीसाठी केली पाहिजे. दुसऱ्यांप्रती द्वेषाच्या भावनेचा त्याग केला, तर तुमचेही कल्याण होईल.