आपण सगळेच जण रोज देवपूजा करतो. कधी अगदी फुरसतीत तर कधी अगदी पटापटा उरकून घेतो आणि इतर कामाला लागतो. परंतु अशाच घाईगडबडीत आपल्याकडून शास्त्रात दिलेल्या देवपूजेच्या नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. ते सोपे नियम कोणते हे जाणून घेऊ.
उपासनेला पूजेची जोड देताना सर्व देवीदेवतांच्या बाबतीत पुढील नियमांचे पालन होणे अनिवार्य ठरते.
>>पूजेची खोली नेहमी स्वच्छ ठेवा कारण तिथून आपल्याला सकारात्मकता मिळते. देवघर गलिच्छ ठेवल्याने साग्रसंगीत पूजा करूनही मनाला प्रसन्नता मिळत नाही, मनःशांती गवसत नाही.
>>पूजा करताना नेहमी आसनावर बसा. थोडा वेळ का होईना ध्यान करा. आपल्यासाठी स्वतंत्र जपमाळ ठेवा. रोज नित्यनेमाने १०८ वेळा न चुकता कोणत्याही उपास्य देवतेचा नामजप करा.
>>पूजेची वेळ निश्चित ठेवा आणि दररोज एकाच वेळी पूजा करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे उपासनेची शक्ती वाढते. हे सातत्य टिकवणे अतिशय महत्त्वाचे आहे. याबाबतीत आपल्याला आपल्या आजी आजोबांचा आदर्श ठेवता येईल.
>>पूजा करताना पांढरे आणि धुतलेले वस्त्र परिधान करा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून तुमचा बचाव होईल आणि पूजेचे पावित्र्य जपले जाईल. त्यालाच आपण सोवळ्यात पूजा करणे असे म्हणतो. तसे केल्याने इतर विषय, विकार, वासना मनाला जडत नाहीत आणि पूजेत मन एकाग्र होते.
>>नेहमी दोन्ही हात जोडून आणि डोकं जमिनीवर टेकवून देवाला नमस्कार करा. तसे केल्याने आपल्यातला अहंकार नष्ट होतो आणि आपण नम्र होतो.
>>दिव्याने दिवा लावू नका. चुकून अपघात होऊन दिवा मालवण्याची शक्यता असते. तसे होणे अशुभ मानले जाते. ते विघ्न टाळण्यासाठी काडीचा किंवा मेणबत्तीचा वापर करून दुसरा दिवा लावावा.
>>तसेच तुपाच्या दिव्यावर तेलाचा दिवा किंवा तेलाच्या दिव्यावर तुपाचा दिवा लावू नका. तूप आणि तेल दोन्ही घटक वेगळे असल्याने ते एकत्रित लावणे योग्य नाही असे शास्त्र सांगते.
>>नेहमी लक्षात ठेवा की भगवान विष्णूच्या पूजेत शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि शनिदेवाच्या पूजेमध्ये राईच्या तेलाचा दिवा लावा.
>>शंकराला कुंकू लावू नका, गणपतीला तुळस वाहू नका, दत्त गुरूंना तांबडे फुल वाहू नका. ज्या देवतेला जे पुष्प प्रिय आहे तेच अर्पण करा.
>>रोज एखादे स्तोत्र अवश्य म्हणा किंवा पूजा करत असताना ऐका. तुमच्या बरोबर घरच्या इतर लोकांकडूनही नकळत ईश सेवा घडेल, वाणी शुद्ध होईल आणि घरातल्या लहान मुलांवर चांगले संस्कार होतील.