एकदा एक साधू महाराज या गावातून त्या गावात प्रबोधन करत चालले असता एका गावात मुक्कामी थांबले. त्यांनी मुद्दाम एक गरीबाच्या झोपडीचा आश्रय मागितला. त्या झोपडीत नवरा बायको दोघेच होते आणि झोपडीबाहेर एक गाय दावणीला बांधली होती.
साधू महाराजांना एका रात्रीसाठी आश्रय मिळावा, म्हणून नवरा बायकोने जमेल तसे आदरातिथ्य केले. प्यायला दूध आणि जेवायला भाजी भाकरी दिली. साधू महाराजांनी त्यांची विचारपूस केली. त्यांचा व्यवसाय विचारला.
नवरा म्हणाला, `आमचे सगळे काही ठिक चालले आहे महाराज. झोपडीबाहेर बांधलेली गाय, तिला आम्ही कामधेनूच म्हणतो. तिच्या कृपेने दोन वेळच्या जेवणाची सोय होत आहे. तिचे अमृततुल्य दूध विकून आमची गुजराण होत आहे.'
तो हे सांगत असताना बायको मात्र धस्फ़ुसत होती. साधू महाराजांनी तिलाही बोलायला सांगितले. ती म्हणाली, `धनी म्हणतात ते खोटे नाही. गायीमुळे आमची रोजी रोटी सुरू आहे. पण किती दिवस हे गरीबीत दिवस काढायचे. मला वाटते, श्रीमंत असावे, उंची कपडे घालावे, दोन वेळच्या जेवणासाठी मिळकतीवर अवलंबून न राहता, अन्नाची कमतरता भासू नये. या उत्पन्नातून आपलेच काय, तर इतरांचेही पोट भरावे. पण दूरवर आशेचा किरण दिसत नाही. काय करावे महाराज?'
त्यावर साधू महाराज म्हणाले, `सर्वप्रथम गाय विकून टाका. तिच्यामुळे तुमची प्रगती थांबली आहे.'असे म्हणत साधू बाबा एक रात्रीची विश्रांती घेऊन निघून गेले. नवरा बायको त्यांच्या बोलण्याचा विचार करू लागले. त्यांना वाटले ही गाय अशुभ आहे, तिच्यामुळेच आपली प्रगती थांबली आहे, असे बहुदा साधू महाराजांना सुचवायचे असावे.
आर्थिक परिस्थिती सुधारावी, म्हणून त्यांनी साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जड अंत:करणाने गायीला योग्य हाती सोपवले. परंतु उत्पन्नाचे एकमेव साधन बंद झाल्यामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिघडली.
साधारण वर्षभराने साधू महाराज तिथे आले आणि त्यांनी त्याच घरात जाऊन आश्रय मागितला. मात्र आता झोपडीवजा घर दुमजली बंगल्यासारखे विस्तारले होते. अंगणात चार गायी, चार बकऱ्या , २ म्हशी, कोंबड्या एवढे पशुधन वाढले होते. दार उघडताच सर्व सुविधांनी युक्त असलेले आलिशान घर दिसले. त्या माणसाने साधूंना ओळखले. व त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन केले, म्हणून फळ मिळाले, असे सांगितले.
साधू महाराजा खुश झाले. एका गायीवर दोघांचा चरितार्थ अवलूंन असल्याने, प्रगतीला वाव नव्हता. ती विकल्यानंतर उपजिवीकेचे साधन गमावल्याची खंत वाटू लागली. व त्याने आणखी मेहनत करून, दुसऱ्याच्या घरी चाकरी करून, पैसे साठवून वर्षभरात स्वत:ची एवढी प्रगती केली, जी त्याने एवढ्या वर्षात कधीच केली नव्हते.
याचाच अर्थ ते दाम्पत्य गायीवर अवलंबून होते. तो आधार सुटल्यामुळे त्यांनी त्यांची प्रगती केली. आपल्यालाही आपली प्रगती करायची असेल, श्रीमंत-यशस्वी व्हायचे असेल, सर्व प्रथम आपली ठराविक चाकोरी मोडायला हवी. चौकटीच्या बाहेरचे विश्व पहायला हवे. तसे केले, तरच तुम्हीदेखील एक ना एक दिवस नक्की यशस्वी व्हाल!