स्वत:चे घर आणि वाहन असणे हे सुबत्तेचे लक्षण मानले जाते. आजही विवाहप्रसंगी मुलाचे आर्थिक स्थैर्य पाहताना या दोन्ही गोष्टी पाहिल्या जातात. घर हे स्थैर्याचे प्रतीक आहे, तर वाहन हे सुखाचे प्रतीक आहे. परंतु, सर्वांच्याच नशीबात हे सुख असतेच असे नाही. काही जणांची संपूर्ण हयात यासाठी खर्च होते, तर कोणाला वाडवडिलांच्या पुण्याईने जन्मत:च हे सुख मिळते. आजच्या काळात या दोन्ही गोष्टी कर्ज काढून मिळवता येतात. परंतु, पूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यातच जाणार असेल, तर सुख मिळूनही काय फायदा? ते पूर्णपणे स्वत:चे होईपर्यंत डोक्यावर कर्जाची टांगती तलवार असते. म्हणून आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर हे सुख आपल्या पदरात पडेल आणि त्यासाठी कोणती ग्रहदशा कुंडलीत असावी लागते, ते जाणून घेऊया.
- ज्यांच्या कुंडलीत चंद्र आणि मंगळ प्रबळ असतात, त्यांचे कमी वयात घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होते. एकापेक्षा अनेक वाहन खरेदीचे योग येतात.
- ज्यांच्या कुंडलीत राहू प्रबळ असतो, त्यांना गृहसौख्य लाभते, परंतु ते सरकारी किंवा भाड्याच्या घराचे असते. स्वत:च्या घराचे स्वप्न सहसा पूर्ण होत नाही.
- शुक्र जेवढा प्रभावी, तेवढे घर आलिशान असते. वाहनसौख्यही लाभते.
- मंगळ वक्र असेल, तर अशा लोकांचे घर खरेदीचे स्वप्न उशिरा का होईना, पण पूर्ण होते, परंतु घरात सतत वादावादी झाल्यामुळे गृहसौख्य लाभत नाही.
- चंद्र दशा ठीक नसेल, तर स्वमेहनतीने घर किंवा वाहन खरेदी करावी लागते. घरच्यांचे सहकार्य लाभत नाही.
कुंडलीतील योग आपल्या हातात नाही. ते तर जन्मत: आपल्याबरोबर जुळून आलेले असतात. अशा वेळी आपल्याला करता येण्यासारखे उपाय कोणते? तर -
- देव्हाऱ्यात लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवून पूजा करा.
- सोने, चांदी किंवा तांब्याची अंगठी अनामिकेत घाला.
- ११ मंगळवार गरिबांना अन्नदान किंवा शिधा दान करा.
- राहूचा प्रभाव असेल, तर घरातून अडगळीच्या वस्तू काढून टाका.
- माता दूर्गा आणि भैरवनाथाची उपासना करा.
- मंगळ आणि शनि यांची कृपादृष्टी नसेल, तर लाल, काळा, निळा या रंगाची गाडी खरेदी करू नका.
- जेव्हा तुमचे घर आणि वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल, तेव्हा गणेश पूजन केल्याशिवाय त्यांचा वापर करू नका.