कुरुक्षेत्रावर आपल्या विरुद्ध आपलेच लोक लढताना पाहून गर्भगळीत झालेला अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, 'कृष्णा या युद्धात माझा पराभव झाला तर मी काय करू? जिंकलो तरी आपल्याच लोकांना हरवल्याचं दुःख कसे सहन करू? त्यापेक्षा आताच युद्धातून माघार घेतली तर पुढचे सगळे प्रश्नच संपून जातील असे वाटत नाही का?
अर्जुनाच्या भ्याड प्रश्नावर श्रीकृष्ण रागावले आणि म्हणाले, 'हे वेळीच ठरवायला हवे होते, कुरुक्षेत्रावर येऊन हा निर्णय घेण्याची ही वेळ नाही. युद्ध जाहीर होण्याआधी हा निर्णय उचित ठरला असता, मात्र युद्ध भूमीवर येऊन पाठ फिरवणे तुला शोभणार नाही. आता युद्ध करणे हेच तुला प्राप्त आहे. संकटाला पाठ दाखवली म्हणून संकट पाठ सोडत नसतात. त्या संकटांचा धिटाईने सामना करावा लागतो. तुला तुझे कर्म करायचे आहे. फळ काय मिळेल हे तुझ्या हातात नाही. आणि या युद्धात तुलाच विजय मिळेल या संभ्रमात राहू नकोस! याक्षणाला तुझ्या तुलनेत कौरवांचा आत्मविश्वास प्रबळ आहे आणि तू संभ्रमित अवस्थेत आहेस. त्यामुळे या युद्धात तुझा पराभवच काय तर मृत्यूही होऊ शकतो. पण त्या विचाराने तू युद्ध सोडू नकोस, कारण...
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।
अर्थात, युद्धात मारला गेलास तर स्वर्गप्राप्ती होईल, जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील. त्यामुळे तू आता फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे कर.
श्रीकृष्णाचा हा उपदेश केवळ अर्जुनासाठी नसून पराभवाची भीती वाटणाऱ्या प्रत्येक मनुष्याला आहे. त्यामुळे हरण्याच्या भीतीने लढणे सोडू नका. हरलात तर अनुभव मिळेल, जिंकलात तर यश मिळेल!