आपण सगळेच जण जे काम करतो, त्या कामाचा काही काळाने आपल्याला कंटाळा येतो आणि हातातले काम सोडून दुसऱ्याच कामाचा विचार मनात घोळू लागतो. दुसऱ्याची प्रगती पाहून त्यांचे काम सोपे वाटू लागते आणि आपले काम कंटाळवाणे वाटू लागते. वास्तविक पाहता, प्रत्येकाला आपल्या कामाचा कधी ना कधी कंटाळा येतच असतो. परंतु असा कंटाळा करत राहिलो, तर कामाची गुणवत्ता घसरेल आणि आहे ते कामही हातून निसटून जाईल. यावर पर्याय एकच आहे, काम बदलू नका, कामाची पद्धत बदला.
एक टॅक्सी चालक होता. मोबाईल क्रमांकावर त्याला प्रवासभाडे मिळत असे. नेहमीप्रमाणे तो प्रवाशाला नेण्यासाठी दिलेल्या जागी पोहोचला. तिथल्या प्रवाशाकडून प्रवासाशी संबंधित पासवर्ड घेऊन त्याने त्यांचे सामान टॅक्सीच्या डिक्कीत ठेवले. प्रवाशाला आदरपूर्वक आत बसवले. प्रवास सुरू झाल्यावर ते ऐसपैस बसले आहेत ना,याची खातरजमा केली. प्रवास छान व्हावा, म्हणून प्रवाशाला टॅक्सीत उपलब्ध असलेली गाण्यांची सेवा, वर्तमान पत्रे, मासिके यांची माहिती दिली. शहराबद्दल काही जाणून घ्यायचे आहे का अशी विचारणा केली. अशा सर्व आदरातिथ्याने प्रवासी भारावून गेला. त्याने आत्मियतनेने टॅक्सी चालकाला विचारले, 'तुम्ही सगळ्याच प्रवाशांना अशी सेवा देता का? मी या सुविधेने भारावून गेलो आहे.'
टॅक्सी चालक म्हणाला, 'हो दादा, मी सर्व प्रवाशांचे असेच आदरातिथ्य करतो. या व्यवसायात येऊन मला ५ वर्षे झाली. आधीची चार वर्षे तेच तेच काम करून कंटाळलो होतो. नवीन व्यवसाय सुरु करावा, अशा विचारात होतो. त्यासाठी एका अनुभवी माणसाचे मार्गदर्शनही घेतले. त्यावेळी त्यांचे शब्द मनाला स्पर्शून गेले. ते म्हणाले, 'आज या कामाचा कंटाळा आला आहे, उद्या दुसऱ्या कामाचा कंटाळा येईल. यावर काम बदलणे हा पर्याय नाही तर कामात बदल करणे हा पर्याय आहे. बदक आणि गरुड यांच्यात फरक काय? बदक डबक्यात पोहत आयुष्य घालवते, तर गरुड उंच भराऱ्या घेऊन आयुष्यात नावीन्य आणत राहते. आपल्याला गरुड बनायला शिकायचे आहे. लोकांसारखा आयुष्यात तोचतोपणा टाळायचा असेल, तर गरुड भरारी घेता यायला हवी. वेगळेपण दाखवण्याची जिद्द हवी. लोक तुमच्या कामाची दखल नक्की घेतील. त्यांचे हे शब्द मनाला पटले आणि तेव्हापासून मी टॅक्सी व्यवसायात नावीन्य आणले आणि त्याचे सर्व प्रवाशांनी कौतुक केले. आता मला कामाचा कंटाळा येत नाही, तर माझे काम मी आनंदाने करतो आणि इतरांनाही चांगली सेवा पुरवून आनंद देतो!'
अशा रीतीने आपण आपल्या कार्यक्षेत्रात गरुड झेप कशी घेऊ शकू, याचा विचार जरूर करा. नाहीतर आयुष्यात डबक्यासारखे साचलेपण येईल आणि आयुष्य निरस वाटू लागेल.