स्पेन मधील ही गोष्ट आहे दहा वर्षांच्या मुलाची. त्याला बालपणापासून जगविख्यात फुटबॉल प्लेयर व्हायचे होते. त्याने आपले स्वप्न अनेकदा आपल्या पालकांना बोलून दाखवले. त्याच्या बोलण्यातली जिद्द ओळखून पालकांनी त्याला चांगल्या फुटबॉल संस्थेत प्रशिक्षणासाठी पाठवले. सुदैवाने त्याला शिक्षकही चांगले लाभले. त्यांनी त्याच्या स्वप्नांना बळ दिले आणि भरपूर मेहनत करवून घेतली.
अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत घेत तो मुलगा नावारूपाला येऊ लागला. आणि पाहता पाहता वीस वर्षांचा झाला. त्याच्या स्वप्नातली सगळ्यात मोठी वैश्विक फुटबॉल स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली होती. तो प्राण पणाला लावून प्रयत्न करत होता. स्पर्धेचा दिवस जवळ येत होता. सगळेच जण स्पर्धेसाठी आणि त्याच्या विश्व विक्रमासाठी उत्सुक होते. परंतु, एक दिवस फुटबॉल सरावासाठी घरातून निघालेला असताना त्याचा दुर्दैवी अपघात झाला. वेळेत उपचार मिळाल्याने तो वाचला, परंतु त्याचा कमरेखालचा भाग काम करेनासा झाला. लकवा आल्याने तो फुटबॉल खेळणे तर दूर, पण चालूही शकणार नव्हता.
त्याच्या आई वडिलांना मुलाचे स्वप्न तुटले याचे वाईट वाटलेच परंतू हे दुःख तो कसे पचवू शकेल याबद्दल काळजी वाटत होती. परंतु मुलगा मुळातच खेळाडू वृत्तीचा असल्याने त्याने हार मानली नाही. स्वप्नांची दिशा बदलली. विश्वविक्रम करण्याचे त्याचे स्वप्न तुटले नव्हते. त्याने कविता, गोष्टी,साहित्य या माध्यमातून व्यक्त होण्यास सुरुवात केली. त्याच्या शब्दांना अनुभवाची धार होती. त्याचे शब्द लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्शू लागले. आणि तो मुलगा पुढच्या पाच वर्षांत स्पेनमधला खूप मोठा गायक बनला आणि त्याने लिहिलेल्या गाण्याच्या सीडी विक्रीने विश्वविक्रम केला. त्या तरुणाचे नाव आहे ज्युलिओ इग्लेसिया!
ही सत्य कथा आपल्यालाही जगण्याचे बळ देणारी ठरू शकते. जर आपण हार मानली नाही तरच! स्वप्न सगळेच पाहतात, पण ती सत्यात उतरवण्याची जिद्द फार थोड्या लोकांमध्ये असते. तुम्ही त्या जिद्दीचे आहात?