आजच्या स्पर्धात्मक युगात तरुणांपुढे नोकरी, लग्न, घर, खर्च, मुलांचे शिक्षण असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न मार्गी लावताना ते अनेकदा बुवा बाबांना शरण जातात आणि श्रद्धेऐवजी अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. आपण काय वागतोय याचीही त्यांना जाणीव नसते. कारण त्यांची श्रद्धा डोळस नसून ते केवळ अंधानुकरण असते. अशात त्यांची उन्नती व्हायची सोडून बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती उद्भवते. म्हणूनच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजवण्यासाठी 'भक्ती डोळस की केवळ श्रद्धेवर' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले. ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर अभिनेत्री गायत्री दातार यांच्याशी ते live संवाद साधणार आहेत.
डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत. राजीमवाले कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे.
अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतीत केले आहे. तसेच त्यांचे वडील श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली. डॉ. पुरुषोत्तम यांच्या वडिलांनी संस्कृतमध्ये पीएचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती. वडिलांकडून वेदाभ्यासाचे धडे घेत त्यांनी आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान इ. विषयांचाही अभ्यास केला. समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे, याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.
अध्यात्माची एवढी चांगली पार्श्वभूमी असलेल्या डॉ. राजीमवाले यांच्याकडून सदर विषयाचा विस्तृत परिचय करून घेण्याची संधी दवडू नका. तुम्हीदेखील सहभागी व्हा, ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर!