आज १५ मे रोजी मासिक दुर्गाष्टमी आहे. देवीची जन्मतिथी म्हणून दर महिन्यातील अष्टमीला हे व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, मासिक दुर्गाष्टमीला पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होते, पाप नष्ट होते आणि माता दुर्गेचा आशीर्वाद जीवनात सदैव राहतो. देवीच्या उपासनेमुळे दुःखातून बाहेर पडण्यात मनुष्याला यश मिळते. तसेच सर्व प्रकारचे दुःख, त्रास, रोग आणि भीतीपासून मुक्ती मिळते. यासोबतच घरात सुख-शांती नांदते. मात्र या उपासनेत काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतात आणि काही गोष्टी डोळसपणे टाळाव्या लागतात. त्या दोन्ही बाबींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
'या' गोष्टी टाळा :
>> दुर्गाष्टमीच्या दिवशी शक्यतो काळे कपडे घालू नये, कारण ही सकारात्मक ऊर्जेची पूजा मानली जाते. देवी मातेचा आशीर्वाद लाभावा म्हणून लाल आणि गुलाबी रंगाचे कपडे घालावेत.
>> मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी पूजा केल्यानंतर साधकाने दिवसा झोपू नये. दिवसभरात शक्य होईल तेव्हा देवीचे नामःस्मरण करावे.
>> दुर्गाष्टमीची पूजा हे एक व्रत आहे, त्यामुळे या दिवशी शाकाहार करावा, मांस-मदिरा घेऊ नये.
'या' गोष्टी करा :
>> हिंदू धर्मात तुळशीचे रोप पूजनीय आहे. तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. त्यामुळे मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने देवी प्रसन्न होऊन घरात सुख-समृद्धी येते.
>> मासिक दुर्गाष्टमीला सकाळी स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यानंतर देवीची पूजा करून आणि यथाशक्ती गरीबांना पैसे, अन्न आणि वस्त्र दान करावे. यामुळे व्यक्तीच्या जीवनात शुभ परिणाम प्राप्त होतात.
दुर्गाष्टमी व्रत का करावे? जाणून घ्या महत्त्व :
असे मानले जाते की मासिक दुर्गाष्टमीला पूजा केल्याने व्यक्तीची सर्व पापे दूर होतात आणि देवीचा आशीर्वाद उपासकाच्या जीवनात सदैव राहतो. तसेच हर तऱ्हेच्या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती या व्रतामधून मिळते.