अश्विन शुद्ध दशमीला संपूर्ण देशभरात दसरा अर्थात विजयादशमीचा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. दसरा ही दिवाळीपूर्वीची नांदीच! त्यात शुभ मुहूर्त म्हणून दसरा या सणाला विशेष महत्त्व असते. नवरात्रीची सांगता दसऱ्याच्या दिवशी केली जाते. असत्यावर सत्याची मात, याचे प्रतीक म्हणून हा विजयादशमीचा सोहळा साजरा केला जातो. प्रभू श्रीरामचंद्रांनी या दिवशी रावणाचा वध केला होता, म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.
हेही वाचा : Dussehra 2020 :दसऱ्याला आपट्याच्या पानाला महत्त्व असते. पण का? जाणून घ्या त्यामागची कथा!
आपण भारतीय हिंदू पंचांगानुसार शुभ मुहूर्त पाहून शुभ कार्याची सुरुवात करतो. दसरा हा मुळातच शुभ मुहूर्त असल्यामुळे त्या सबंध दिवसभरात प्रत्येक क्षण हा शुभच मानला जातो. त्यासाठी वेळ, काळ, नक्षत्र, तिथी पाहावी लागत नाही, असे ज्योतिष सांगतात. यादिवशी सुरुवात केलेल्या शुभ कार्यात हमखास यश मिळते, असेही म्हटले जाते. दसऱ्याला देवीची, श्रीरामाची, हनुमंताची, गणपतीची विशेष पूजा केली जाते. त्या निमित्ताने श्रीसूक्त, श्रीरामरक्षा, हनुमान चालिसा, अथर्वशीर्ष या स्तोत्रांचे पठण करणे लाभदायक ठरते.
दसऱ्यापासून मंगलकार्याची सुरुवात करण्याची प्रथा!
पूर्वीच्या काळी मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त निवडला जात असे. दगडी पाटीवर खडू किंवा पेन्सिलीने श्रीगणेश लिहून अंकांची सरस्वती काढली जात असे. विद्यार्थ्यांनी हर तऱ्हेच्या कला, साहित्य, संगीत इ. क्षेत्रात मुशाफिरी करून अज्ञानाचे, अंधश्रद्धेचे सीमोल्लंघन करावे, ही त्यामागची सदिच्छा असते. काळ बदलला, पाटी-पेन्सिल गेली, परंतु परंपरा अखंड सुरु आहे. वही-पुस्तकावर नाहीतर अगदी संगणकावर सरस्वती रेखाटून शुभ कार्याचा श्री गणेशा केला जातो. आपल्या कार्यक्षेत्राची भरभराट व्हावी, म्हणून सरस्वती पूजनाबरोबर दसऱ्याच्या दिवशी वह्या, पुस्तक, संगणक, अवजार, वाहन इ. गोष्टींचीही पूजा केली जाते. झेंडूचे तोरण लावून हळद-कुंकू, फुले वाहून स्वस्तिक रेखाटले जाते. विवाह कार्य वगळता सर्व मंगल विधी या दिवशी करता येतात.
दसऱ्याची सुरुवात
यंदा नवरात्री नऊ दिवसांची नसून आठ दिवसांची होती. त्यामुळे नवरात्रीची सांगता म्हणजेच दसऱ्याचा दिवस २५ ऑक्टोबर रोजी आहे. २४ ऑक्टोबरला सकाळी ६.५८ पर्यंत अष्टमी असणार आहे. त्यांनंतर नवमीची सुरुवात होईल आणि २५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याचा मुहूर्त असणार आहे.
दसऱ्याचे मुहूर्त -
दशमी तिथी प्रारंभ - २५ ऑक्टोबर ७. ४१ मिनिटांनी सुरुवात विजय मुहूर्त - दुपारी १.५५ ते २. ४० पर्यंत अपरान्ह पूजा मुहूर्त - दुपारी १. ११ ते ३. २४ पर्यंत दशमी तिथी समाप्त - २६ ऑक्टोबर सकाळी ९ पर्यंत.
हेही वाचा : Navratri 2020: नवरात्रीत अनवाणी का चालतात, जाणून घ्या!