दसरा हा हिंदूंच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे, कारण या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध करून विजयोत्सव साजरा केला होता. समाजातील रावणासारख्या दुष्प्रवृत्तीचे दहन व्हावे म्हणून दरवर्षी या दिवशी रावण दहन करून आपण हा सण साजरा करतो. तसेच आपट्याचे पान देऊन आपापसातील मतभेद विसरून विचारांचे सोने लुटतो. नवरात्रीचा हा दहावा दिवस परवावर येऊन ठेपला आहे. यंदा १५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. हा दिवस तर शुभ आहेच, परंतु या दिवशी जुळून येणाऱ्या आणखी तीन शुभ मुहूर्तांमुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
यंदाचा दसरा :
या वर्षी दसरा शुक्रवार, १५ ऑक्टोबर २०२१ रोजी साजरा केला जाईल. यंदा नवरात्री ७ ऑक्टोबरला सुरू झाली. तसेच चतुर्थी आणि पंचमीची तिथी एकत्र आल्यामुळे नवरात्री फक्त आठ दिवसांची झाली. त्यानुसार, महानवमी १४ ऑक्टोबर रोजी आहे आणि तिच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल. या दिवशी जुळून येणारे विशेष मुहूर्त पाहू.
दसऱ्याचा शुभमुहूर्त :
गुरुवार, १४ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ०६. ५२ पासून अश्विन शुद्ध दशमी दशमी सुरू होत आहे आणि शुक्रवार, १५ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ०६.०२ मिनिटांनी ही तिथी संपेल. परंतु दशमीची तिथी १५ तारखेचा सूर्योदय पाहत असल्यामुळे विजय दशमीचा सण शुक्रवारी १५ ऑक्टोबर २०२१ रोजी साजरा केला जाईल.
शस्त्र पूजनाची वेळ :
दसऱ्याच्या दिवशी आपण वाहनांची, शस्त्राची आणि शैक्षणिक साहित्याची पूजा करतो. पाटीवर, वहीवर अंकांची सरस्वती रेखाटून त्याची पूजा केली जाते. त्याचे शुभ मुहूर्त जाणून घेऊ.
अभिजित मुहूर्त - सकाळी ११. ४३ ते दुपारी १२.३० पर्यंत.विजय मुहूर्त - दुपारी २.०१ दुपारी ते दुपारी २.४७ पर्यंत अमृत काल मुहूर्त - संध्याकाळी ६.४४ ते रात्री ८.२७ पर्यंत.
यादिवशी जुळून येणारे तीन शुभ योग -
यावेळी दसऱ्याच्या दिवशी ३ शुभ योग तयार होत आहेत. पहिला योग रवि योग आहे जो १४ ऑक्टोबर रोजी रात्री ९. ३४ मिनिटांनी सुरू होईल आणि १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३१ पर्यंत चालू राहील. दुसरा योग म्हणजे सर्वार्थ सिद्ध योग, जो १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.०२ मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी ९.१५ मिनिटांपर्यंत चालेल. याशिवाय तिसरा योग कुमार योग आहे, जो सकाळी सूर्योदयापासून ९.१६ मिनिटांपर्यंत सुरू होईल. असे मानले जाते की या तीन शुभ योगांची एकत्र निर्मिती झाल्यामुळे दसऱ्याला पूजा करणे खूप शुभ होईल. या तिन्ही योगांच्या एकत्रित येण्याने आणि त्या शुभमुहूर्तावर पूजा केल्याने यश, सिद्धी, कीर्ती, वैभवाची द्वारे उघडणार आहेत. त्यामुळे ही संधी दवडू नका.
ही पूजा कशी करावी -
दसऱ्याच्या दिवशी पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे कापड अंथरून घ्या. त्यावर गणपतीची आणि देवीची किंवा रामाची प्रतिमा ठेवा. त्याला हळद, कुंकू, फुले अर्पण करा. तसेच नवग्रहांची स्थापना करा आणि आपल्या इष्ट देवतेची पूजा करा. स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवा. यानंतर, आपल्या इच्छेनुसार गरजूंना दान आणि दक्षिणा द्य. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्या. देवाला आपट्याचे पण ठेवा आणि नंतर इतरांना ते सोने अर्पण करा.
हा सण आपल्याला अनैतिकता, अंधश्रद्धा, अनाचार याविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. ही प्रेरणा घेऊन आपणही आपल्यातला राम आणि जगदंबा जागृत करून अन्यायाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली पाहिजे.