अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी देशभरात दसरा किंवा विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. यावेळी ही शुभ तिथी बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी आहे. दसऱ्याच्या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. यादिवशी शस्त्रपूजा केली जाते. विजयादशमीच्या सणाशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे भगवान रामाने रावणाचा वध आणि देवी दुर्गेने महिषासुराचा शेवट. या विजयाचा आनंद केवळ देशभरातच नाही, तर जगभरात उत्साहाने साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी रामलीलेत रावणासह कुंभकरण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचेही दहन केले जाते. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.
रावण दहनानंतर हे काम करा
दसऱ्याला रावणाचे मोठे पुतळे दहन केले जातात. रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याचा शुभ मुहूर्त सूर्यास्तानंतर रात्री ८.३० पासून असेल. रावण दहन नेहमीच प्रदोष काळात फक्त श्रवण नक्षत्रातच केले जाते. अश्विन महिन्यातील दशमी तिथीला नक्षत्र उगवते तेव्हा सर्व कार्ये पूर्ण होतात. रावण दहनानंतर त्याची थोडीशी राख घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. ही रक्षा रामाने दुष्ट प्रवृत्तीवर केलेली मात याची जाणीव करून देते. ती एका पुडीत बांधून आपल्या तिजोरीत ठेवावी. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात समृद्धी राहते असे म्हणतात.
दसऱ्याचे महत्व
दसरा तिथीची संध्याकाळची वेळ अत्यंत शुभ मानली जाते आणि हा काळ विजय काल म्हणून ओळखला जातो. ज्योतिषांच्या मते, या मुहूर्तावर तुम्ही कोणतेही काम सुरु कराल, त्यात तुम्हाला विजय मिळेल, पण ते काम तुम्हाला मनापासून करावे लागेल, अशी अट आहे. कोणतेही नवीन काम किंवा गुंतवणूक, नवीन विषयाच्या अध्ययनाची सुरुवात अशा अनेक शुभ गोष्टी करू शकता. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय, कार खरेदी, घर खरेदी या मुहूर्तावर करणे शुभ मानले जाते. लोकश्रद्धेनुसार दसऱ्याच्या दिवशी नीळकंठ पक्षी पाहणे अत्यंत शुभ मानले जाते. पण आजकाल नीलकंठ पक्षी क्वचितच दिसतात.
शमीची पूजा
दसऱ्याच्या संध्याकाळी शमीच्या झाडाची पूजा करण्याचीही प्रथा आहे. दसर्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने भाग्य उजळते आणि ग्रह-नक्षत्रांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. नवरात्रीमध्ये शमीच्या पानांनी देवीची पूजा केली जाते. यासोबतच शमीची पाने महादेवालाही अर्पण केली जातात. दुसरीकडे, शमीचे झाड हे न्याय देवता शनिचे असल्याचे मानले जाते. त्यालाही शमी अर्पण केली जाते.
जया-विजया देवीची पूजा:
दसर्याचा सण पावसाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूचा प्रारंभ दर्शवतो. या दिवशी अपराजिता देवीसोबत जया आणि विजया यांचीही पूजा केली जाते. जे लोक दरवर्षी दसऱ्याला जय आणि विजयाची पूजा करतात, त्यांना नेहमी शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि त्यांना कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही. असे मानले जाते की भगवान रामाने नऊ दिवस माता दुर्गेची पूजा केली आणि नंतर जया-विजया देवींची पूजा केली. यानंतर राम रावणाशी लढायला निघाले.