दसरा या सणाला आपण विजयादशमी असेही म्हणतो. कारण या दिवशी श्रीरामांनी रावणाचा आणि देवीने महिषासुराचा वध केला होता, म्हणून हा विजयोत्सव विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. आपणही आयुष्यात यश, कीर्ती मिळवावी म्हणून शस्त्र आणि शास्त्र पूजन करतो. तसेच हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोनं खरेदी, वाहन खरेदी, वस्तू किंवा वास्तू खरेदी केली जाते. तसा हा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो, मात्र त्यातही खरेदी, विक्री तसेच पूजेसाठी शुभ मुहुर्त सांगण्यात आले आहेत, ते जाणून घेऊ.
शस्त्रे व वाहनांच्या पूजेची वेळ : सकाळी ६.०० ते ९.००, दिवसा १०.३० ते १२.००, दुपारी ४.३० ते ६.००, संध्याकाळ ७.३० ते रात्री ९.००.
(आपले वाहन धुवा आणि सुंदर सजवा. त्यावर फुलांची माळ अर्पण करा आणि सर्व देवी-देवतांचे स्मरण करून आणि नऊ ग्रहांचे स्मरण करून त्याची पूजा करा.)
शास्त्र अर्थात वही, पुस्तक, वाद्य इ गोष्टींच्या पूजेची वेळ: सकाळी १०.३० ते १२.००, संध्याकाळी ७.३० ते ९.००
(रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा, आदित्य हृदय स्तोत्र, दुर्गा चालीसा, श्रीसूक्त आणि सुंदरकांड यांपैकी कोणतेही स्तोत्र भक्तीने म्हणा)
अभिजित मुहूर्त: सकाळी ६.00 ते ९.00, दुपारी ११.४८ ते १२.१५ , संध्याकाळी ४. ३० ते ६.००
(या मुहूर्तावर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करू शकता. या मुहूर्तामध्ये सुरू केलेल्या कार्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. या मुहूर्तावर पूजा करून कोणतीही शुभ इच्छा केली तर ती निश्चितच पूर्ण होते.)
रावण दहनाची शुभ मुहूर्त: रावण दहनाची वेळ संध्याकाळी ४. ३० ते ६.00, ७.३० ते ९.00, संध्याकाळी १०.१० ते ११.१३ अशी आहे.
(रावण-दहन करण्यापूर्वी आई अंबे भवानी आणि प्रभू रामचंद्र यांची पूजा करावी. त्यानंतर श्रीरामाच्या जयजयकाराने रावणदहन पूर्ण करावे.)
विशेष- १. ४३ ते ३. १२ पर्यंत कोणत्याही प्रकारची पूजा करू नका.
सामान्य शुभ वेळ- ७.00 ते ९. १०, दिवस- १०.00 ते १२. ५०, दुपारी ४.१२ ते ६.३० वा.
या दिवशी वाहन पूजा करावी, विद्यार्थ्यांनी वहीवर अंकाची सरस्वती काढून पूजा करावी, तसेच शस्त्र, वाद्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचीही हळद कुंकू, फुल वाहून पूजा करावी आणि श्रीसूक्त म्हणत देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांचा आशीर्वाद घ्यावा.