संत नामदेव म्हणतात, 'अहंकाराचा वारा न लागो राजसा!' का? कारण अहंकार हे सर्व दु:खाचे मूळ आहे. गंमत म्हणजे अहंकार झालेल्या व्यक्तीला आपण अहंकारी आहोत, हेच कळत नाही आणि लोक सांगतात ते पटत नाही. म्हणून आपण अहंकारापासून मुक्त आहोत की नाही, याची स्वत: चाचपणी केली पाहिजे.
देवी भागवतात सांगितले आहे, संसार नाशाचे मूळ कारण अहंकार आहे. धर्म विनाशाचे कारणही अहंकार आहे. अहंकार आपल्या मनात असुरक्षित भावनेला जन्म देतो. अहंकार यशप्राप्तीतून येतो, पण त्याचवेळेस अपयशाची भीती मनाला पोखरत जाते. जेवढा मोठा अहंकार तेवढी जास्त असुरक्षितता!
सर्वांना माहित आहे, प्रत्येकाला एक ना एक दिवस या विश्वाचा निरोप घ्यायचा आहे. तरी स्वत:च्या नावाभोवती मोठे वलय निर्माण करण्याची धडपड कशासाठी? कोणासाठी? कालचक्र फिरत राहते. त्रिकालबाधित काही राहणार असेल, तर ते म्हणजे भगवंताचे नाम! हे माहित असूनही लोक स्वत:ला सर्वश्रेष्ठ म्हणवून घेण्यासाठी धडपडत राहतात. जर तुम्ही स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजत असाल, तर तुमच्या मनाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटता कामा नये. जर तुम्ही मनोमन घाबरत असाल, एखादी चिंता तुमच्या मनाला सलत असेल, तर लक्षात घ्या, आपण वृथा अभिमान बाळगत आहोत. आपल्यातील अहंकार ओळखण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. ज्यादिवशी मन भयमुक्त होईल, त्यादिवशी आपल्यातून अहंकाराचा लवलेश निघून गेला, असे म्हणता येईल.
स्वत: सिद्ध करण्यासाठी आज प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे. अशात अपयश आले, तर ते तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही आणि यश आले, तरी ते तुम्हाला गर्वाने भरून टाकेल. यश-अपयशाकडे जेव्हा आपण समतेने बघायला शिकू, तेव्हा आपण अहंकाराला हरवू शकू. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या तत्त्वांमध्ये मी नाही, मी आहे तो केवळ परमात्म्याच्या ठायी!
ब्रह्म आणि अहंकार हे दोघे परस्परविरोधी आहेत. अहंकारी व्यक्ती ब्रह्नाची प्रचिती घेऊ शकत नाही. ब्रह्म म्हणजे सहजता. आपण जसे आहोत, तसा स्वत:चा स्वीकार करणे. आपल्या हातून झालेल्या चुकांची सहजतेने क्षमा मागणे आणि दुसऱ्यांकडून झालेल्या चुकांना सहजतेने क्षमा देणे, हेच ब्रह्मज्ञान आहे. या तीन गोष्टी ज्यांनी समजून घेतल्या त्यांना अहंकार कधीच स्पर्श करू शकणार नाही.