शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

Eknath Shashthi 2022 : आज एकनाथ षष्ठीनिमित्त नाथांच्या अभंगातून करूया पंढरीची वारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:50 PM

Eknath Shashthi 2022: पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ते प्रत्येक भक्ताचे हक्काचे घर आहे. त्याचे सुंदर वर्ण एकनाथ महाराज आपल्या अभंगात करताना म्हणतात...

आज एकनाथ षष्ठी अर्थात संत एकनाथ महाराज यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त पैठण येथे तीन दिवसीय सोहळा असतो. कथा, कीर्तन, पालखी, गोपाळकाला असे उत्सवाचे स्वरूप असते. ज्यांना या उत्सवाला जाता आले नाही, त्यांनी नाथांच्या अभंगातून पंढरीच्या वारीचा सोहळा अनुभवावा. 

पंढरपूर हे समस्त वारकऱ्यांचे माहेर. एखादी माहेरवाशीण ज्या ओढीने आपल्या माहेरी जाते, तसे समस्त वारकरी पंढरीची वाट धरताना अगतिक होतात. कोणाची बरे त्यांना एवढी आस लागलेली असते? तर सावळ्या विठुची आणि रखुमाईची! त्यांची गळाभेट तर शक्य नाही, निदान पदस्पर्श तरी, तेही शक्य नाही, तर किमान कळसाचे दर्शन तरी. एवढी पांडुरंगाच्या सान्निध्यासाठी अल्पसंतुष्ट वृत्ती वारकऱ्यांच्या ठायी असते.  

पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ते प्रत्येक भक्ताचे हक्काचे घर आहे. त्याचे सुंदर वर्ण एकनाथ महाराज आपल्या अभंगात करताना म्हणतात, 

माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी,बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई,पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू,माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पाप भंगा,एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण।।

पंढरपुरच्या पांडुरंगाशी, भीमेच्या काठाशी, चंद्रभागा नदीशी, पुंडलिकाच्या पायरीशी, एवढेच नव्हे तर तिथल्या कणाकणाशी आपला किती जुना ऋणानुबंध आहे, हे सांगताना नाथ महाराज भावुक होतात. भीमसेन जोशी यांच्या सुस्वरात हा अभंग ऐकताना आपलेही मन तेवढेच व्याकुळ होते आणि भीमेच्या तीरावर संतांच्या मांदियाळीत जाऊन पोहोचते. हीच आहे त्या माहेरची ताकद.

पंढरपूर गाव पूर्वी 'पौंडरिक क्षेत्र' या नावे प्रसिद्ध होते. कारण पांडुरंगाने तिथे मुक्काम केला, असा उल्लेख स्कंदपुराणात आहे. वर्षानुवर्षे वारकरी पंढरपुरात जाऊन विठ्ठलरखुमाईच्या पावलावर मस्तक ठेवत आहेत, त्यामुळे देवाच्याही पायाची झिज झालेली आहे. तसे असले, तरी तो आजही आपल्या लेकरांची वाट पाहत उभा आहे. सासरी गेलेल्या लेकीची आई वडील वाट पाहतात, त्या आतुरतेने भगवंत आपल्या भक्तांची वाट पाहतो आणि माहेरी आलेली लेक जशी सुखाने, हक्काने नांदते तसा भक्त पंढरपुरात वावरतो म्हणून एकनाथ महाराज पंढरीला माहेराची उपमा देतात. 

विठुमाऊली ही वारकऱ्यांची उपास्य देवता आहे. मुख्यत: महाराष्ट्र आणि कर्नाटकात त्याच्या भक्तीचा प्रवाह वाहत राहिला आहे. विठ्ठल हे विष्णुंचा अवतार मानले जातात. म्हणून सर्व वारकरी विष्णूशी संबंधित एकादशीचे व्रत करतात. विठ्ठलाला तुळशी प्रिय आहे. विष्णू, कृष्ण आणि विठ्ठल यांचे ऐक्य रूढ आहे. नंदाघरी राहणारा कृष्णच विठ्ठलरूपाने पंढरीत प्रगटला, असे निवृत्तीनाथांनी म्हटले आहे. ज्ञानदेवांच्या मतानुसारही श्रीविठ्ठल भीमानदीच्या काठी आला आणि आपल्या सुदर्शन चक्रावर त्याने पंढरी वसवली. द्वारकेचा राजा, आपल्या भक्ताला भेटायला पंढरपुरात आला. तेव्हा त्याचा भक्त पुंडलिक माता-पित्यांची सेवा करण्यात मग्न होता. सेवा अर्धवट राहू नये आणि पांडुरंगाला बसायला वीट सरकवली, तर पांडुरंग त्या विटेवर उभा राहीला. भक्ताच्या आज्ञेखातर तो युगे अठ्ठावीस कटेवर हात ठेवून विटेवर उभा राहिला आहे. एवढी आपुलकी माहेरच्या माणसांशिवाय आणखी कोण दाखवतं का सांगा, म्हणून तर नाथ महाराज पंढरपुराला आपले माहेर आणि विठ्ठलरखुमाईल मायबाप मानतात. तोच भाव समस्त भक्तांच्या ठायी आहे. 

अशा पंढरपुरच्या पांडुरंगाची आणि रुख्मिणी मातेची भेट घेण्यासाठी लवकरच माहेरी जाण्याचा योग यावा, हीच त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना!