दिवाळी पाठोपाठ तुळशीच्या लग्नाची लगबग सुरू होते आणि तुळशीचे लग्न झाले, की घरातील विवाहकार्याचा शुभारंभ होतो. यंदाही प्रबोधिनी एकादशीनंतर विवाह मुहूर्त आहेत. मात्र, विवाह मुहूर्तांचा कालावधी अतिशय कमी आहे.
विवाह हा सोळा संस्कारांपैकी महत्त्वपूर्ण संस्कार आहे. दोन जीवांच्या संसाराची गाठ बांधण्यासाठी आपल्याकडे शुभमुहूर्त पाहण्याची प्रथा आहे. शुभमुहूर्त अर्थात, असा मंगल क्षण, ज्यावेळेस सर्वार्थाने परिस्थिती वधू आणि वरासाठी अनुकूल असते, ती घटिका!
चातुर्मासात लग्नसमारंभ केले जात नाहीत. मे-जून नंतर लग्नमुहूर्त निघतात, ते थेट दिवाळीनंतर! कारण, तो कालावधी चातुर्मासाचा असतो. त्या कालावधीत देव आराम करतात, अशी श्रद्धा असते. आषाढी एकादशीला विश्रांतीस गेलेले देव प्रबोधिनी एकादशीला जागे होतात, असे म्हटले जाते. म्हणून या काळात देवाच्या अनुपस्थितीत शुभकार्ये केली जात नाहीत. आपल्या संस्कृतीने प्रत्येक कार्य श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणत भगवंताच्या चरणी अर्पण करण्याची शिकवण दिली आहे. त्यामुळे आयुष्यातील सर्वात मंगल आणि कलाटणी देणारा क्षण देवाच्या साक्षीने पार पडावा, असा सर्वांचा आग्रह असतो. यासाठीच विवाह मुहूर्त पाहून शुभकार्य ठरवले जाते. माघ, फाल्गुन, ज्येष्ठ, आषाढ, मार्गशीर्ष हे मराठी महिने विवाहासाठी उचित मानले जातात. तसेच हस्त, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, स्वाति, मघा, मूळ, अनुराधा, मृगशिरा, रेवती, रोहिणी ही नक्षत्रे अनुकूल मानली जातात.
कोरोनाने जवळपास पूर्ण वर्ष वाया घालवले. त्यामुळे लग्नेच्छुक वर-वधुंसाठी वर्षातील शेवटचा महिना हीच विवाहासाठी संधी आहे. कारण, पंचांगानुसार १५ डिसेंबर २०२० ते १८ एप्रिल २०२१ पर्यंत लग्न मुहूर्तांचा अभाव असणार आहे. म्हणून, यावर्षातील शेवटचे आठ लग्न मुहूर्त पुढीलप्रमाणे-
२७ नोव्हेंबर शुक्रवार कार्तिक शुद्ध द्वादशी अश्विनी नक्षत्र२९ नोव्हेंबर रविवार कार्तिक शुद्ध चर्तुदशी रोहिणी नक्षत्र३० नोव्हेंबर सोमवार कार्तिक पौर्णिमा रोहिणी नक्षत्र१ डिसेंबर मंगळवार मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा रोहिणी नक्षत्र७ डिसेंबर सोमवार मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी मघा नक्षत्र९ डिसेंबर बुधवार मार्गशीर्ष कृष्ण नवमी हस्त नक्षत्र१० डिसेंबर गुरुवार मार्गशीर्ष कृष्ण दशमी चित्रा नक्षत्र११ डिसेंबर शुक्रवार मार्गशीर्ष कृष्ण एकादशी चित्रा नक्षत्र
लागा तयारीला...!