नेपोलियन या महान सम्राटाने शौर्य, अहंभाव, पैसा, सत्ता याद्वारे दृश्य सृष्टीमधील सर्व सुखे मिळवली. एका नशेतच तो जीवन जगला म्हणावयास हरकत नाही. आणि असे बेपर्वाईचे खोटे, सुखी जीवन जगण्यासाठी अनेकदा अनेकांशी शुष्क वाद-विवाद करण्यासाठी तो मागे पुढे पाहत नसे.
उतारवय लागले आणि या भ्रामक गोष्टींच्या मागे लागून वेड्यासारखी सगळी शक्ती कुठेतरी वापरली याची त्याला जाणीव आणि पश्चात्ताप झाला. मन:शांती बिघडून गेली. स्वाभाविकच अंतर्मुखता आली. या अंतर्मुखतेमधून अध्यात्मिक ग्रंथवाचन सुरू झाले. परिणामी स्वत:चा वेडेपणा अधिकाधिक लक्षात येऊ लागला. बुद्धिमान अशा या माणसाला, शाश्वत समाधान मिळवण्याच्या मार्गी लागलो असतो, प्रयत्न केले असते तर, आंतरिक समाधान मिळाले असते, असे वाटू लागले.
म्हणजेच शाश्वत समाधानासाठी कामधेनू स्वत:जवळ असताना तीसुद्धा आपणच भिकाऱ्यासारखे अशाश्वत सुख मिळवण्यासाठी दृष्यवस्तू, माणसे यांच्या दारी अशाश्वत सुखाचे ताक मागत फिरलो, याची खंत वाटली. परंतु आता फार उशीर झाला होता. असेच काहीसे आपल्या बाबतीतही घडते.
अशा वेळी समर्थ रामदास स्वामींच्या ओळी आठवतात, घरी कामधेनू पुढे ताक मागे,हरीबोध सांडूनि वीवाद लागे,करी सार चिंतामणी कांचखडे,तया मागता देत आहे उदंडे। स्वत:मधील चैतन्याची जाणीव करून न घेतल्यामुळे आयुष्यात बहुतेक लोकांना बाह्यसुखाचे नसलेले ऐश्वर्य वाटणारे दारिद्रय भोगावे लागते. यासाठीच संत सांगतात, प्रत्येक क्षण आनंदाने जगून घ्या. आज काम उद्या आराम याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. म्हणून आज आराम करून घ्या असेही योग्य नाही. वेळच्या वेळी प्रत्येक गोष्टीचा समतोल राखला तर पश्चात्तापाचे क्षण वाट्याला येणार नाहीत.