एका गावात एक माणूस राहत होता. तो अतिशय कंजूष होता. गावकरी त्याला हसायचे. पण त्याने त्याच्या वृत्तीत कधीच बदल होऊ दिला नाही. पण याच कंजूष वृत्तीने त्याने बरीच माया गोळा केली होती. कालपर्यंत त्याला हसणारे गावकरी आता त्याला पाहून आश्चर्यचकित होऊ लागले. त्याला मानाने वागवू लागले. एवढेच काय, तर धन, संपत्ती कशी साठवावी, यासाठी उपाय विचारू लागले.
काही काळातच शेजारच्या गावात त्याच्यापेक्षा आणखी मोठा कंजूष माणूस असल्याचे गावकऱ्यांना कळले. इकडची रांग तिकडे वळली. पहिल्या कंजूष माणसाला ते अपमानास्पद वाटले. त्याने बाजूच्या गावात जाऊन तिथल्या कंजूष माणसाची भेट घ्यायची असे ठरवून टाकले.
ठरवल्या प्रमाणे तो त्याला भेटायला निघाला. परंतु रिकाम्या हातांनी कसे जाणे हे आपल्या संस्कारात बसत नाही आणि खर्च करणे हे आपल्या स्वभावाला मानवत नाही. यावर बराच विचार करून त्याने उपाय शोधून काढला. उन्हाळ्याचे दिवस होते. आंब्याचा मौसम होता. त्याने एक कागद घेतला आणि त्यावर चार आंब्यांचे चित्र काढून ते चार आंबे भेट म्हणून द्यायचे ठरवले. आंब्यांचा कागद खिशात टाकून कंजूष माणूस त्या दुसऱ्या कंजूष माणसाच्या घरी पोहोचला. पण तो बाहेरगावी गेल्याचे कळले. थोडीफार बोलणी झाल्यावर त्याने आपल्या खिशातला कागद काढला आणि मुलाला म्हणाला, ' हे घे चार आंबे, बाबा आले की त्यांना दे आणि मी येऊन गेलो सांग!'
मुलगा म्हणाला, 'काका, घरी आलेल्या पाहुण्यांना रिकाम्या हाताने पाठवण्याची आमची रीत नाही.' असे म्हणत तो कागदाची बचत करून हवेत चार आंबे काढतो आणि सांगतो, 'हे चार आंबे तुम्ही घेऊन जा आणि घरी जाऊन निवांत खा!'
कंजूष माणूस चक्रावतो. मुलगा असा तर बाप कसा? तो तिथून पळ काढतो आणि आणि घरी येतो. घरी आल्यावर घडलेला प्रसंग मुलाला सांगतो. त्यावर मुलगा म्हणतो, 'बाबा, आपल्याकडे पण बाजूच्या गावातले काका आले होते. त्यांनी मला आंब्याचे चित्र काढलेला एक कागद दिला. मी पण मानी शिवाय तुमचा मुलगा. मी पण ते आंबे फुकट घेतले नाहीत, मोबदल्यात दोन आंबे हवेत रेखाटले आणि म्हटले हे घेऊन जा आणि घरी जाऊन खा! बघा, मी वाचवले की नाही दोन आंबे?'
आहे ना मजेशीर गोष्ट? गोष्ट वाचून तुमच्या चेहऱ्यावर जी हास्यरेषा उमटली आहे, ती मिटणार नाही याची काळजी घ्या! कारण, जो आयुष्याचे हसत हसत स्वागत करतो, त्याच्याच आयुष्यात भरभरून आनंद येतो.