ज्योत्स्ना गाडगीळ
'आधुनिक वाल्मिकी' अशी ज्यांना बिरुदावली मिळाली, ते लोकप्रिय गीतकार ग.दि.माडगुळकर अर्थात आपले गदिमा, यांची आज जयंती. संवेदनशील कवी, लेखक, अभिनेते यापलीकडे समाजभान राखणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व अशी गदिमांची ओळख सबंध महाराष्ट्राला परिचयाची आहे. त्यांचे अनेक किस्से आपण ऐकले, वाचले असतीलही. परंतु, गदिमा हे नाव उच्चारताच ओघाने शब्द येतो, तो 'गीतरामायण.' प्रासादिक काव्यपुष्पांचा नजराणा. त्यातील कोणतेही काव्यपुष्प घ्यावे, हुंगावे आणि रामकथेचा प्रसंग शब्दचित्रातून साकार होताना पहावा, एवढे जीवंत वर्णन.
त्याच संग्रहातले एक काव्यपुष्प, आयुष्याचे मर्म सांगणारे, जगण्याला बळ देणारे आणि सबंध रामायणाचे सार कथन करणारे आहे. गदिमांच्या जयंतीनिमित्त, त्या गीताची उजळणी करूया. ते गीत आहे...पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा!
दैव जात दु:खे भरता, दोष ना कुणाचा,पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा।
वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकून, माता कैकयीने केलेल्या दुष्कृत्याचा धिक्कार करून, जीवापाड प्रेम असलेल्या ज्येष्ठ भावाची भेट घेण्यासाठी, त्यांना अयोध्येत परत नेण्यासाठी भरत अगतिक झाला आहे. तेव्हा त्याची समजूत काढताना प्रभू श्रीराम सांगतात, `जे घडलं, त्याचा दोष कोणालाही देऊ नकोस, प्रत्येकाला आपले प्रारब्ध भोगावेच लागतात. जन्म-मृत्यू आपल्या हातात नाही, परंतु, जन्म आणि मृत्यू यादरम्यान मिळालेले आयुष्य सार्थकी कसे लाववायचे, ते आपल्या हातात आहे. तू शोक करण्यात वेळ वाया घालवू नकोस, 'अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा....पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा'
हेही वाचा: एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...
ही अशी समजूत काढल्यावर भरताची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी! ज्यांच्या हाती विश्वाची सूत्रे आहेत, तोच सूत्रधार दुसऱ्याच्या हाती आपल्या आयुष्याची सूत्रे सोपवून स्वत:ला पराधीन म्हणतो आणि आहे ती परिस्थिती स्वीकारून मार्गक्रमण कर सांगतो, ते बोल अखिल विश्वाला प्रेरक ठरतात.
'शो मस्ट गो ऑन' असे आपण म्हणतो. परंतु, हे वास्तव स्वीकारणे अतिशय अवघड. मात्र गदिमा लिहितात, 'मरण कल्पनेशी थांबे, तर्क जाणत्यांचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा.' मरण शाश्वत आहे, ते स्वीकारून प्रत्येकाला पुढे जावेच लागते. हे सत्य, प्रभू रामचंद्रांनी स्वीकारले, पचवले, तिथे आपली काय कथा?
हेही वाचा : मनाचा कोपरा दररोज आवरा.
भरताला उद्देशून रामरायांच्या तोंडी लिहिलेले हे गीत दहा कडव्यांचे आहे. त्यातील पुढीच कडवे, तर उच्चांकच!
दोन ओंडक्यांची होते, सागरात भेट,एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ,क्षणिक आहे तेवी बाळा, मेळ माणसाचा,पराधिन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा!
नदीच्या पात्रात वाहत आलेले दोन ओंडके काही क्षणांसाठी एकत्र येतात आणि प्रवाहाला वेग मिळाला, की आपापले मार्ग बदलून दोन दिशांना जातात. हेच मनुष्य जीवनाचेही सत्य आहे. आपली भेट क्षणिक आहे. दोन ओंडके कधी वेगळे होतील माहित नाही, म्हणून हे क्षण भरभरून जगून घ्या. रुसवे, फुगवे यात वेळ वाया घालवू नका. कधी कोणती लाट येईल आणि आयुष्याची दिशा बदलेल, सांगता येत नाही, ते कोणाच्याच हाती नाही, म्हणून आपण पराधीन. तरीही परिस्थिती स्वीकारून मनस्थिती बदलणे आणि आपले विहित कार्य करणे, हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे.
गदिमांच्या प्रत्येक काव्यात असा दोन ओळींमधला अर्थ शोधून लिहायचा ठरवला, तरीदेखील तो प्रबंधाचा विषय होईल. असे महाकवी आपल्याला लाभले, हे आपले भाग्यच. ही शब्दसुमनांजली त्यांना अर्पण करून, आपणही सदर गीतातून बोध घेऊया.