आपण कितीही चांगले वागलो तरी आपल्याला वाईटात पाहणारी, आपल्या कामाच्या मध्ये येणारी, आपल्याला नावे ठेवणारी माणसे सभोवताली असतात. त्यांच्याकडे आपण दुर्लक्षही करतो. मात्र एखाद व्यक्ती अशीही असते, जिच्याबद्दल मनात तीव्र प्रमाणात द्वेष, संताप, नकारात्मक भावना असते. ती व्यक्ती समोर आली किंवा तिचा नुसता विचार जरी मनाला स्पर्शून गेला तरी आपण अस्वस्थ होतो. अशा खलनायकामुळे आपल्या आयुष्याची वाताहत होऊ न देता त्यांच्याशी संयमाने कसे वागायचे हे सांगताहेत गौर गोपाल दास.
'विसरा आणि माफ करा' हे सुखी जीवनाचे सूत्र आहे. मात्र ते आचरणात आणणे महाकठीण! कारण, आपल्या बुद्धीला वाईट गोष्टींचे दीर्घकाळ स्मरण राहते. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही विसरू पाहता तेव्हा ती अधिक प्रखरतेने लक्षात राहते. म्हणून ती सोडून द्यायला शिका. उदाहरणार्थ, आपण हातात मोबाईल धरला, तर थोड्या वेळ काही वाटणार नाही, काही वेळाने हाताला मुंग्या येतील, दिवसभर धरून ठेवला तर हात जड होईल, दोन दिवस धरून ठेवला तर हाताला अर्धांग वायूचा झटका येईल. त्यापेक्षा तो थोडा वेळ हातात ठेवला आणि काम झाल्यावर बाजूला ठेवला तर यातना होणार नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मोबाईल धरून ठेवतात त्रास मोबाईल ला नाही तर तुम्हाला होणार आहे. हीच बाब आयुष्यात आलेल्या त्या नकारात्मक व्यक्तींच्या बाबतीत लक्षात ठेवा. त्यांच्या आठवणी दीर्घकाळ मनात उगाळत बसलात तर त्रास तुम्हाला होईल, त्यांना नाही!
ज्याप्रमाणे मोबाईलमध्ये मेमरी फुल झाली की अनावश्यक गोष्टी आपण एका बटणासरशी डिलीट करतो, तशा आपल्या मनात साचलेल्या आठवणी एका बटणावरती डिलीट होणाऱ्या नाहीत. म्हणून त्या वेळोवेळी काढून टाकाव्या लागतील. जेणेकरून तुम्ही हँग होणार नाही. दुसऱ्यांवर रागावून, चिडून, वाट्टेल तसे बोलून मनस्ताप तुम्हाला होतो हे कायम लक्षात ठेवा, कृती करणाऱ्याला त्याचे सोहेरसुतक नसते. तो वागून मोकळा होतो, पण त्रास आपण काढतो. यासाठी अशा लोकांना माफ करा, दुर्लक्ष करा, अनोळखी व्यक्ती समजून त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका. असे केल्याने तुमचे आयुष्य सोपे होईल, समाधानी होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचे हिरो बनू शकाल!