एक राजा होता. जो नि:संतान होता. वयोमानाने थकला होता. त्याच्या राज्याला उत्तराधिकारी नसल्याने तो नेहमी चिंतीत असे. राज्याचा कारभार उचित हाती सोपवून राजाला निवृत्ती घ्यायची होती. पण ही जबाबदारी सोपवायची कोणाला, याबद्दल राजाने प्रधानाशी सल्ला मसलत केली.
तत्कालीन व्यवस्थेप्रमाणे अशी परिस्थिती उद्भवल्यास हत्तीच्या सोंडेत पुष्पमाला सोपवून राजा निवडण्याची तयारी दर्शवावी, असे प्रधानाने सुचवले. राजाला पटले. त्याने राज्यात दवंडी पिटवली. हत्तीची सूक्ष्म दृष्टी व्यक्तीची पारख करताना चुकत नाही, या बाबीवर विश्वास ठेवून पंचक्रोशीतल्या लोकांना बोलावून राज्याच्या प्रिय हत्तीला जबाबदारी सोपवली. हत्तीने तीन -चार परिक्रमा घातल्या. सर्वांची उत्कंठा वाढली. अचानक त्याने एका फाटक्या वेषातल्या युवकाच्या गळ्यात पुष्पमाला घातली. टाळ्यांचा कडकडाट झाला. नवीन राजा नियुक्त झाला. राजाची काळजी मिटली. राज्याची सूत्र त्याच्या हाती सोपवून त्याने निवृत्ती घेतली.
नवीन राजा पूर्वानुभव नसतानाही सहकाऱ्यांच्या मदतीने, नम्रपणे राज्यकारभार करू लागला. लोकांची नवीन राजावर श्रद्धा बसू लागली. हा नवनिर्वाचित राजा रोज दिवसभराचे काम काज आटोपून एका बंद खोलीत एकटाच जात असे. तिथे तासभर घालवून मग झोपी जात असे. त्या खोलीच्या चाव्या फक्त राजाकडे होत्या. राज दरबारातल्या लोकांमध्ये तो उत्सुकुतेचा विषय झाला. ही चर्चा राज्यभर पसरली. एक दोघांनी राजाला विचारून पाहिले पण त्याने उत्तर द्यायचे टाळले.
लोकांची वाढती चर्चा पाहून शेवटी एक दिवस राजाने दरबार भरवला आणि सांगितले, 'आज मी तुम्हाला त्या बंद दालनाविषयी सांगणार आहे. तिथे तुमच्या कल्पनेतली एकही वस्तू नाही. तर तिथे आहे माझा जुना अंगरखा. तोच अंगरखा, जो मी राजा म्हणून नियुक्त झालो त्या दिवशी घातला होता. तो मी त्या बंद दालनात जतन करून ठेवला आहे.'
तसे करण्यामागचे नेमके कारण काय, असे प्रधानाने विचारले असता राजा म्हणाला, 'आपले मूळ काय, आपण कोणत्या परिस्थितीतुन आलो, आपले हात आकाशाला लागले तरी आपले नाते धरणीशी आहे या गोष्टींची जाणीव सतत होत राहावी आणि डोक्यात अहंकाराचा शिरकाव होऊ नये, म्हणून मी रोज तो अंगरखा पाहतो. चिंतन करतो. जे मिळाले आहे ते देव दयेने मिळाले आहे. मला ते जबाबदारीने पार पाडायचे आहे आणि अमुक एका वेळी मलाही निवृत्त व्हायचे आहे, याची जाणीव मला हा अंगरखा कायम देत राहील.'
या कथेतून बोध हाच घ्यायचा, की राजासारखी एक रहस्यमय खोली प्रत्येकाकडे असावी. ही खोली माती विटांची, भिंतींची नसली तरी चालेल, ती मनाच्या कोपऱ्यात जरूर असावी. कारण त्या खोलीत आपले जुने दस्तावेज, आपल्या आठवणी आणि आपले सोनेरी दिवस कैद असतात! त्याची वरचेवर उजळणी होत राहिली की अहंकाराचा वारा आपल्यालाही कधीच लागणार नाही. तुमच्याकडे आहे अशी रहस्यमय खोली?