ज्याची शिकण्याची तयारी आहे, तो शिष्य आणि ज्याची शिकवण्याची तयारी आहे, तो गुरु. अशी गुरु-शिष्याची साधी, सोपी, सरळ व्याख्या आहे. भारतात तर गुरु-शिष्य परंपरा अतिशय मोठी आहे. आपल्यालाही आयुष्यात गुरु लाभावेत, असे वाटते, परंतु, आजच्या भोंदू बाबांच्या आणि स्वयंघोषित गुरुंच्या दुनियेत सच्चा गुरु कसा शोधावा, याचे मार्गदर्शन गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून मिळते.
गोंदवलेकर महाराज म्हणतात, `व्यवहारात आपल्याला गुरु करावा लागतो, गुरूच नको असे म्हणून कसे चालेल? गुरु मिळण्यासाठी आधी शिष्य तयार होणे गरजेचे आहे. शिष्य तयार झाला, की गुरु त्याचा शोध घेत आपोआप येतील. गुरुंच्या भेटीआधी शिष्याचा अभिमान दूर झाला पाहिजे. अभिमान गेल्याशिवाय देव भेटत नाही, म्हणून अभिमान घालवण्यासाठी आणि सन्मार्ग दाखवण्यासाठी गुरु हवा. म्हणून तर, संत नामदेवांनासुद्धा अहंकार झाला असता, मुक्ताईने त्यांना गुरु करण्याचा सल्ला दिला. तेव्हा कुठे, नामदेवांनी गुरुचा शोध घेतला आणि गुरुंच्या आशीर्वादाने त्यांचा पांडुरंग नव्याने भेटला. शिष्य होण्याची तयारी पूर्ण झाली की गुरूंचा शोध घ्यावा.
गुरु कसे ओळखावे?
गुरवो बहव: सन्ति, शिष्य वित्त: पहारका,गुरवो विरल: सन्ति, शिष्य हृत्त: पहारका।।
वरील सुभाषितात, गुरु कोणाला म्हणावे, याची छान व्याख्या दिली आहे. शिष्याच्या धनावर, संपत्तीवर, पैशांवर डोळा ठेवून त्यांना लुटणारे, अनेक गुरु असतात. ते शिष्याचे वित्तहरण करतात. मात्र, खरे गुरु शिष्याचे हृत्त, अर्थात हृदयाचे हरण करतात. असे गुरु अतिशय विरळ म्हणजे कमी असतात. म्हणून आपण ज्यांना गुरु मानतो ते आपले वित्त घेतात, की चित्त, हे आपण तपासून पहायला हवे.
जो शिष्याला विषयात ओढील, त्याला गुरु कसे म्हणावे? जो चमत्कार करुन दाखवतो, त्याला आपण बुवा म्हणतो, पण तो गुरु नाही. गुरुंची परीक्षा त्यांच्या बाह्यांगावरून करावी. सर्वाभूती भगवंत ज्याला पाहता येईल, त्यांना गुरु म्हणावे. गुरुंच्या संगतीत मनावर जो परिणाम होईल, त्यावरून गुरुंची परीक्षा करावी. ज्यांच्या सहवासात मन निर्विकार होईल, त्यांना गुरु म्हणावे.
शिष्याच्या जोरावर जे मोठे होऊ पाहतात, ते गुरु नाहीत, तर जे आपल्या शिष्याला मोठे करतात, त्यांना गुरु म्हणावे. आध्यात्म मार्गात असे गुरु लाभणे अवघड, परंतु ज्यांना असे गुरु लाभतात, त्यांचा भगवद्प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. असे गुरु लाभले असता, शिष्याने गुरुंच्या आज्ञेचे पालन करावे.
शास्त्रे आणि वेद अनंत आहेत. ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे? सद्गुरु नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार आपल्याला देतात. म्हणून गुरुप्राप्तीचा सदैव ध्यास हवा.