Vinayak Chaturthi March 2025 Vrat In Marathi: फाल्गुन महिना सुरू झाला आहे. मराठी वर्ष आता सांगतेकडे आले आहे. फाल्गुन महिन्याच्या सुरुवातीलाच चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. हजारो घरात अगदी भक्तिभावाने हे व्रताचरण केले जाते. फाल्गुन शुद्ध विनायक चतुर्थी कधी आहे? कसे व्रताचरण करावे? शुभ मुहूर्त आणि मान्यता जाणून घेऊया...
प्रत्येक मासाच्या शुद्ध चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्त्व असते. प्रत्येक मासाच्या शुद्ध आणि वद्य चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत, असे म्हटले जाते.
फाल्गुन शुद्ध विनायक चतुर्थी: सोमवार, ०३ मार्च २०२५
फाल्गुन शुद्ध चतुर्थी प्रारंभ: रविवार, ०२ मार्च २०२५ रोजी रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे.
फाल्गुन शुद्ध चतुर्थी समाप्ती: सोमवार, ०३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०६ वाजून ०२ मिनिटे.
भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे फाल्गुन शुद्ध विनायक चतुर्थीचे व्रत सोमवार, ०३ मार्च २०२५ रोजी आचरावे, असे सांगितले गेले आहे. ही विनायक चतुर्थी सोमवारी येत असल्यामुळे महादेव शिवशंकराचे मनोभावे पूजन करावे. नामस्मरण करावे, असे सांगितले जात आहे.
फाल्गुन विनायक चतुर्थी व्रताचरणाची सोपी पद्धत
गणेश पूजनाचा संकल्प करावा. चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले, लाल फुले, दुर्वा वाहाव्यात. गणपती अथर्वशीषाचा पाठ करून नैवेद्य दाखवावा. आरती करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. गणपतीचा जप, नामस्मरण करावे. तसेच आपले कुळधर्म, कुळाचार याप्रमाणे अन्य विधी करावेत. शक्य असल्यास अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. अनेक घरांमध्ये विनायक चतुर्थीचा उपवास केला जाते. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. तसेच सोमवारी विनायक चतुर्थी येत असल्याने चंद्र ग्रहाशी संबंधित पूजन, मंत्रांचे जप, नामस्मरण, दानधर्म करावा, असे सांगितले जाते. यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकते. तसेच चंद्राचे प्रतिकूल प्रभाव, परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते, असे म्हटले जाते.
ही गोष्ट अवश्य करावी
गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||