दर महिन्यात दोन एकादशी येतात. चैत्र मासात पापमोचनी आणि कामदा एकादशी येणार आहेत. वर्षारंभी येणाऱ्या दोन्ही एकादशींचे वैशिष्ट्य पहा, पापमोचनी एकादशी सर्व पापांचे निराकरण करते, तर कामदा एकादशी सर्व इच्छांची पूर्ती करते. या दोन एकादशीच नव्हे, तर वर्षभरात येणारी प्रत्येक एकादशी वैशिष्ट्यपूर्ण असते. म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत आवर्जून करतात. ही तिथी भगवान महाविष्णूंची प्रिय तिथी असल्यामुळे एकादशी व्रत केले असता त्यांची कृपादृष्टी लाभते. या व्रताचे दिवशी दोन्ही वेळेस उपास करून केवळ फलाहार करणे अपेक्षित असते. 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा जप करून दुसरे दिवशी अन्न ग्रहण करून व्रत पूर्ण करायचे असते.
एकादशी कोणतीही असो, त्याचे भरघोस फायदे मिळतात. त्यातही ती पापमोचनी एकादशी असेल तर अधिकाधिक फायदे पदरात पाडून घेता येतील. हे फायदे पुढीलप्रमाणे-
- पापमोचनी एकादशी व्रत केले असता सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते. यानिमित्ताने जाणते अजाणतेपणी झालेल्या पापांबद्दल भगवंताची क्षमा मागावी.
- पापांचा नाश झाल्यावर सुख समृद्धीची द्वारे आपोआप खुली होतात.
- हे व्रत केले असता वाजपेय आणि अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते व सर्व कार्यात यश मिळते.
- हे व्रत केले असता मोक्ष प्राप्ती होते.
- भविष्यात आपल्या हातून पाप घडू नये, याची जाणिव करून देणारी ही एकादशी आहे.
- या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले वाहून त्यांची पूजा केल्यास कृपादृष्टी प्राप्त होते.
- या दिवशी नवग्रहांची पूजा केली असता, कुंडलीतील ग्रहांचा प्रकोप सौम्य होतो.
- पापमोचनी एकादशी व्रत केल्याने मनातील पापांचा निचरा होऊन मन निर्मळ बनते.
- कितीही अडचणी आल्या, तरी हे व्रत चुकवू नये. हे व्रत भक्तिभावे केले असता, उचित फलप्राप्त होते.
- या व्रतामुळे हर तऱ्हेच्या पापांपासून मुक्ती मिळते.