दर महिन्यात दोन एकादशी येतात. अशा रितीने वर्षभरात २४ एकादशी येतात. अधिक मासात आणखी दोन एकादशींची भर पडते आणि वर्षभरात २६ एकादशी होतात. माघ मासात षटतिला आणि जया एकादशी येते. उद्या अर्थात १२ फेब्रुवारीला जया एकादशी आहे. तिलाच भिष्म एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी केली असता चार लाभ होतात.
या एकादशीचे महत्त्व श्रीकृष्णाने युधिष्ठिराची समजूत घातली होती. त्यामुळे त्याचे अस्वस्थ मन शांत झाले. एकादशीमुळे मन आणि शरीर एकाग्र होते. प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे. जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते. या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते, अशी श्रद्धा आहे.
हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे. यंदा १२ फेब्रुवारी रोजी माघ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. ही एकादशी जया एकादशी या नावे ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हे व्रत अतिशय पुण्यदायी मानले जाते. असे म्हटले जाते, की या व्रतामुळे भूत, पिशाच्च आदि योनीतून मुक्तता मिळते. विष्णूंचे नामस्मरण केले असता वाईट शक्तींचा प्रभाव समूळ नष्ट होतो. म्हणूनच केवळ एकादशीलाच नाही तर सातत्याने भगवंताचे अनुसंधान मनात ठेवावे. जेणेकरून सकारात्मक शक्तीचे प्राबल्य वाढेल आणि वाईट, नकारात्मक गोष्टींवर जया अर्थात विजय प्राप्त करता येईल. त्याचे स्मरण करून देणारी ही एकादशी.
जया एकादशीच्या दिवशी ग्रहस्थिती उत्तम जुळून येणार असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातूनही अधिक वाढते. जया एकादशीचे व्रत केल्यामुळे धन संपत्तीत वाढ होते व आपल्या दैनंदिन कार्यात यश प्राप्त होते.
हे व्रत तीन प्रकारे केले जाते. उपाशी राहून, फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन! परंतु, आजच्या धकाधकीच्या जिवनात असे कठोर व्रत करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा. एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यानिमित्त विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे, विष्णूंना भक्तीभावाने तुळस वाहणे विंâवा गरजू लोकांना यथाशक्ती दान केले, तरी एकादशीचे पुण्य पदरात पाडून घेता येते.
'देव भावाचा भुकेला' असे संतांनी सांगून ठेवले आहे. त्याला अपेक्षित असलेली निस्सिम भक्ती आणि प्रामाणिकपणा त्याच्या सेवेत अर्पण केला, की व्रतपूर्ती झाली असे समजण्यास हरकत नाही.