भयाला मारता येत नाही. जिंकता येत नाही. केवळ समजून घेता येते. त्या जाणून घेण्यातूनच भयाचे रुपांतरण घडून येते. हे जाणणेच रुपांतरण घडवू शकते. अन्य काहीही नाही. तुम्ही भयाला जिंकू बघाल तर ते दडपले जाईल. आत खोल तुमच्या नेणीवेत दडून, रुजून राहील. त्याने कोणतीही समस्या सुटत नाही. उलटपक्षी गुंतागुंत वाढेल. जेव्हा भय उपजेल तेव्हा तुम्ही त्याला दडपून टाकाल. भय जिंगण्याचा हाच मार्ग तुम्हाला माहीत असतो. भयाला तुम्ही दडपू शकता. इतक्या खोलवर दडपून ठेवू शकता, की तुमच्या चेतनेतून ते नाहीसे होऊ शकते. तुम्हाला त्याचा पत्ताही लागणार नाही. ते खोल नेणीवेच्या तळघरात पडून राहील. पण ते आपले काम करत राहील. तेव्हाही ते तुमच्यावर स्वार होण्याचा प्रयत्न करत राहील. तुमचा ताबा घेईल. पण इतक्या अप्रत्यक्ष तऱ्हेने तुमचा ताबा घेईल की तुम्हाला पत्ताही लागणार नाही. म्हणजे धोका आणखीनच वाढला. शिवाय तो इतका अप्रत्यक्ष रुपात असेल की तुम्हाला कळणारही नाही.
म्हणून भय जिंकायचा प्रयत्न नको. त्याला मारणेही नको. भयाला तुम्ही मारू शकत नाही. कारण त्याच्यात एक प्रकारची ऊर्जा असते आणि कोणतीही ऊर्जा कधीही नष्ट होत नाही. तुम्ही कधी लक्षपूर्वक जाणले आहे का? भीतीच्या क्षणी मनात ऊर्जा निर्माण होते. क्रोधाच्या वेळी जशी प्रचंड ऊर्जा निर्माण होते, तशीच ती भीतीच्या वेळी होते. एकाच ऊर्जेचे हे दोन पैलू आहेत. क्रोध आक्रमक आहे आणि भय अनाक्रमक आहे. भय ही क्रोधाची नकारात्मक अवस्था आहे आणि क्रोध भयाची साकारात्मक अवस्था आहे. तुम्हाला जेव्हा क्रोध येतो, तेव्हा किती ताकद येते. सारे शरीर ऊर्जेने भरून जाते. जेव्हा प्रचंड संताप आलेला असतो तेव्हा तुम्ही मोठाले पाषाणखंड उचलून फेकून देऊ शकता. सर्वसामान्यपणे असे शिलाखंड तुम्ही हलवूही शकणार नाही. क्रोध आलेला असताना तिप्पट चौपट अधिक शक्ती तुमच्या अंगी संचारते. त्या वेळी तुम्ही अशा काही गोष्टी करता ज्या एरवी साध्य होणे अशक्य असते.
भय निर्माण झाल्यावर तुम्ही केवढ्या वेगाने धावता. ऑलिम्पिकच्या धावपटूला सुद्धा मत्सर वाटेल. भयाच्या वेळी ऊर्जा निर्माण होते. खरे तर भय ही ऊर्जाच आहे आणि ऊर्जा कधी नष्ट होत नाही. ती अविनाशी असते. ती फक्त रुपांतरित होत जाते. आपल्या अस्तित्त्वातील चिमूटभर ऊर्जासुद्धा नष्ट करता येत नाही. ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा नाहीतर तुमच्या हातून मोठी चूक घडेल. कामात चुका होतील. या जगातल्या कोणत्याही गोष्टीला तुम्ही नष्ट करू शकत नाही. केवळ त्याचे रूप बदलू शकता. छोट्याशा खड्याला तुम्ही नष्ट करू शकत नाही. इतकेच काय वाळूचा एक कणदेखील तुम्ही नष्ट करू शकत नाही. तो केवळ आपले रूप बदलेल. तुमच्या प्रयत्नांनी त्याच्या रंगरुपात बदल होईल. पण त्यचा विनाश घडून येणार नाही. पाण्याच्या एका थेंबालासुद्धा तुम्ही नष्ट करू शकत नाही. तो केवळ आपले रूप बदलेल, इतकेच! तुम्ही त्याचा बर्फ बनवू शकता. वाफ बनवू शकता. पण तो थेंब अस्तित्त्वात असेलच. कुठे ना कुठे तो राहिलच. या विश्वाच्या पसाऱ्यात त्याचे अस्तित्त्व असेलच. असेच तुम्ही भय नष्ट करू शकत नाही. युगायुगापासून माणूस असा व्यर्थ प्रयत्न करत आहे.
भय, क्रोध, काम, लोभ आणि अशा किती एक गोष्टी त्याने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सारे जग असा प्रयत्न करत आले आहे. काय परिणाम झाला? मनुष्यात खळबळ माजली. काहीही नष्ट झाले नाही. सगळे तसेच आहे. फक्त गोष्टींची गुंतागुंत झाली. काही नष्ट केले जाऊ शकत नाही. म्हणून भय काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, नष्ट न करता त्यावर मात करण्याच प्रयत्न करा.