फाल्गुन मास हा वसंताचा आणि सोबतच उन्हाळ्याचा. चैत्रपालवी आलेली येते, सृष्टी आपले रूप पालटत असते. हा निसर्गसोहळा पाहण्यासाठी या व्रतांचे आयोजन केले आहे. अन्यथा रोजच्या धावपळीतून निसर्गाकडे निरखून बघायला इथे वेळ कोणाला आहे? सूर्य, चंद्र, तारे रोज येतात आणि जातात, फुलं उमलतात कोमजतात, आपण किती वेळ त्यांच्याकडे तल्लीनतेने पाहतो? नाही पाहत ना? म्हणून या व्रत वैकल्यांच्या निमित्ताने निसर्गाच्या अधिक जवळ जावे, निसर्गाचा आस्वाद घ्यावा, तजेला घ्यावा आणि नव्या उमेदीने आयुष्यात मार्गक्रमणा करावी, हा मूळ उद्देश असतो.
आमलकी एकादशी ही तिथी आवळा एकादशी म्हणूनही ओळखली जाते. फाल्गुन मासात शुक्ल पक्ष एकादशीला आमलकी एकादशीचे व्रत केले जाते. या तिथीला आवळा एकादशी असेही म्हटले जाते.आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णूंचे वास्तव्य असते. या वृक्षाच्या प्रत्येक अंशात भगवंताचे वास्तव्य असते. या दिवशी आवळ्याचा वापर आणि आवळ्याच्या वृक्षाची यथासांग पूजा केली असता, भगवान विष्णू प्रसन्न होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा १४ मार्च रोजी आमलकी एकादशी आहे.
श्रद्धेने का होईना, लोकांचा निसर्गाशी संबंध यावा, यासाठी सण वारांचे नाते भगवंताशी जोडले आहे. यामुळे देवाचे आणि पर्यायाने निसर्गाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.
वैज्ञानिकदृष्ट्या या तिथीचे महत्त्व लक्षात घेतले, तर रोगनिवारणाची बाब तर्कशुद्ध वाटते. आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक व रुचकर आहे. आवळा हा आम्ल-मधुर रसाचा, शीत-वीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. यामध्ये शोधनाचा गुण असल्याने रक्तात साचलेली विषद्रव्ये दूर करून रक्त शुद्ध करतो. अशाच प्रकारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्तधातूंमध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्ये दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतो. या त्याच्या गुणांमुळेच शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे आवश्यक आहे. ताजा आवळा उपलब्ध नसेल तर वाळलेल्या आवळ्याची पूड म्हणजेच आवळा चूर्ण औषधामध्ये वापरावे. आवळा चूर्णमध्येही ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. आवळा सेवनाचे हे फायदे, तर आवळ्याच्या शितल छायेत विसावा घेतला, तर कितीतरी फायदे होतील.
यासाठी व्रताच्या निमित्ताने आपणही आवळ्याच्या वृक्षाचा शोध घेऊन त्याचे सान्निध्य अनुभवूया आणि आपले रोगनिवारण व्हावे, यासाठी प्रतिदिन आवळासेवन करूया. आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली, तरच सुदृढ शरीराने आणि सुदृढ मनाने ईश्वराने सोपवलेल्या कामाची पूर्ती करू शकू आणि ईश्वरकृपादेखील प्राप्त करू शकू.
या दिवशी उपास करणे अपेक्षित आहे. तसेच फलाहारात आवळ्याचा समावेश करावा आणि आवळ्याचा झाडाची पूजा करावी हे महत्त्वाचे आहे.