ज्योत्स्ना गाडगीळ
मंदिरात देवदर्शन झाल्यावर आपली पावले नकळत प्रदक्षिणेच्या मार्गाने वळतात. पण ही प्रदक्षिणा का घातली जाते, शिवाय प्रदक्षिणेतही प्रकार आहेत का? याबद्दल वेदवाणी प्रकाशित, शास्त्र असे सांगते, या पुस्तकातून सविस्तर माहिती घेऊया.
मंदिराचा परिसर ही भारीत भूमी मानली जाते. तिथल्या वातावरणातील सकारात्मकता आपल्या अंगी उतरावी, म्हणून आपण मंदिरात जातो. देवदर्शन घेतो आणि देह, बुद्धी, चित्त व वाणी यातील विकार दूर होण्यासाठी भगवन्नाम घेत प्रदक्षिणा घालतो. ही प्रदक्षिणा आपल्या उजव्या बाजूने घातली जाते. मुखाने नामस्मरण सुरू असल्यामुळे चित्त विचलित होत नाही. मंदिराचा सबंध परिसर पायाखालून जातो. त्यामुळे चहुबाजूंनी सकारात्मकता अंगात भिनते. प्रदक्षिणेचे ध्येय समोर असल्यामुळे मनात अन्य विचार येत नाहीत. प्रदक्षिणेमुळे उपचार व उपासना या दोन्ही गोष्टी साध्य होतात. प्रदक्षिणेचे अनेक प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे-
देवप्रदक्षिणा : षोडशोपचार पूजेतील पंधरावा उपचार म्हणजे देवप्रदक्षिणा. मंदिरात गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मंत्र किंवा अन्य स्तोत्र, नामस्मरण घेत प्रदक्षिणा घातली जाते. त्यातही शंकराच्या देवळात अर्धीच प्रदक्षिणा घालायची असते. शंकराचे तीर्थ ओलांडायचे नसते. बाकी मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालणे शक्य नसले, तर अशावेळी स्वत:भोवती प्रदक्षिणा घातली, तरी चालते. म्हणून आरती झाल्यावर, `घालीन लोटांगण' म्हणताना आपण स्वत:भोवती प्रदक्षिणा घालून उपचार पूर्ण करतो आणि आरती संपल्यावर साष्टांग नमस्कार अर्थात लोटांगण घालतो.
मंदिरप्रदक्षिणा : मंदिरातील काही देवता दर्शनप्रधान असतात तर काही प्रदक्षिणाप्रधान असतात.तु म्हणजेच देवांचे केवळ दर्शन घेऊन प्रदक्षिणेचा मार्ग गाभाऱ्याभोवती नसून मंदिराभोवती असतो, त्याला मंदिरप्रदक्षिणा म्हणातात.
क्षेत्रप्रदक्षिणा : यात लघुपरिक्रमा आणि दीर्घ परिक्रमा असे दोन प्रकार असतात. लघुपरिक्रमेत आपल्या परिसरातील, गावातील, शहरातील तीर्थकुंडे, देवस्थाने, क्षेत्रपाल मंदिर आदिंचा समावेश होतो. तर दीर्घपरिक्रमेत पंचक्रोशीतील देवस्थानांचा, तीर्थस्थानांचा समावेश होतो. प्रदक्षिणेचा उपचार तोच, मात्र स्थल-काल बदलल्यामुळे त्याचे स्वरूप बदलते. त्याला क्षेत्रप्रदक्षिणा म्हणतात.
नदीप्रदक्षिणा : नदी प्रदक्षिणा केवळ पायीच करायची असते. त्यात सुपरिचित परिक्रमा आहे, ती म्हणजे नर्मदा परिक्रमा. तिचा अनुभव अनेक भाविकांनी घेतलाही असेल. नदी परिक्रमेत त्याच नदीत स्नान, संध्या करणे, तसेच नदीचे पाणी पिणे, माधुकरी मागून जेवणे इ. नियम पाळावे लागतात. नर्मदेप्रमाणे कृष्णा, गोदावरी, तुंगभद्रा या नद्यांच्या प्रदक्षिणा प्रसिद्ध आहेत. नदीप्रदक्षिणेच्या प्रवासात विश्वरूपदर्शन घडते, असे गीतेतही म्हटले आहे. हा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी याचि देही, याचि डोळा अनुभवावा.
वृक्षप्रदक्षिणा : वृक्षप्रदक्षिणेत प्रामुख्याने वड, अश्वत्थ (पिंपळ), औदुंबर, तुळशी यांना प्रदक्षिणा घालणे पुण्यकारक समजले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. तर पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीपुरुष दर शनिवारी विष्णुसहस्रनाम स्तोत्र म्हणत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, हा मंत्र म्हणत पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. परपिडा दूर व्हावी म्हणून भगवान दत्तात्रेयांचे स्मरण करून औदुंबराला प्रदक्षिणा घातली जाते. तर, रोज सकाळी तुळशीचे सान्निध्य लाभावे, म्हणून तुळशी वृंदावनाभोवती प्रदक्षिणा घातली जाते.
अशा रितीने प्रदक्षिणा हे तपाचरण आहे. देवतेच्या आराधनेचा भाग आहे. म्हणून प्रदक्षिणा घालताना काया, वाचा, मनाने प्रभूनाम घेत तिथल्या वातावरणाशी एकरूप होणे, इष्ट ठरते.
हेही वाचा : 'मांजर आडवी गेली की काम होत नाही', हा भन्नाट 'शोध' कुणी, कसा आणि का लावला माहित्येय?