कोरोनाची बेडी पायात आणि भीती मनात बसली, म्हणून का होईना, घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणारा मनुष्य दोन घटिका स्थिरावला. परंतु, शांत झाला नाही. स्थिर मनुष्य शांत असेलच असे नाही. याचा प्रत्यय आपण सर्वांनीच घेतला. देहाने स्थिरावूनही मन अस्थिर होते. पावलांना, मनाला बाहेरचे जग खुणावत होते. समाज माध्यमांतून बाह्य परिस्थितीचा आढावा घेणेही सुरूच होते. परंतु, या गडबडीत आत डोकावण्याची संधी आपण गमावून बसलो.
पायाला भिंगरी लागलेला मनुष्य सॅलरी पॅकेजेसचे घबाड हाती लागल्यापासून विकेंड फार्म हाऊसवर, उन्हाळी सुटी थंडीच्या ठिकाणावर, पावसाळी सुटी ट्रेकींगवर, हिवाळी सुटी परदेशी दौऱ्यात खर्ची करू लागला. सुटी मिळताच फिरायला जाणे आणि परत आल्यावर बैलासारखे घाण्याला जुंपणे, हा जणू काही राहणीमानाचा भाग झाला. मात्र, एवढा वेळ, पैसा, शक्ती खर्च करूनही इप्सित साध्य झाले का? गर्दी आहे पण माणसे नाहीत. अशी परिस्थिती एकांत देत नाही, तर एकाकी पाडते. याबाबत संतांचे विचार काय आहेत जाणून घेऊ.
आजच्या या धकाधकीच्या स्पर्धेच्या युगात महानगरात निसर्गसंपन्न व एकांतपूर्ण जागा सापडणे कठीण आहे. स्वच्छ हवा, पाणी यांचे दर्शनही होत नाही. सर्व प्रदुषणाने वेढलेले आहे. परंतु, मध्ययुगीन संतांनी निसर्गरम्य, शांत व स्वच्छ एकांतस्थळाचा महिमा वर्णन केला आहे. टाकळी, सज्जनगड, शिवथर, चाफळ, इ. सौंदर्यस्थळे समर्थांनी पसंत केली होती. त्यांच्या मते एकांतेवीण प्राणियाते बुद्धि कैची?
यासाठीच अनेक साधूसंत निसर्गसंपन्न एकांतस्थानाचा आश्रय घेतात. ते भोवतीच्या लोकांना विटले होते असे नाही, तर त्यांना साधनेसाठी एकांत हवा होता. याचसाठी तुकाराम महाराज भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन वृक्षवेलींशी मैत्री करत. हिमालयातही अनेक महात्म्यांचे आश्रम होते.
साधकाने ध्यानधारणेसाठी, चिंतनासाठी, मन एकाग्र करण्यासाठी स्थान कोणत्या प्रकारचे निवडावे, यासंबंधी ज्ञानेश्वरांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे. ते म्हणतात - असे स्थान पाहून नास्तिकालाही ईश्वराची आठवण व्हावी. त्याचे भटकते मन स्थिर व्हावे. याठिकाणी मोजके साधक असावेत व येथील वाटा फारशी मळलेल्या नसाव्यात. लोकांची विशेष वर्दळ नसावी. नेहमी गोड फळे देणारी झाडे असावीत. या ठिकाणी पावलोपावली निर्मळ पाण्याचे झरे असावेत. ऊनदेखील सौम्य असावे. वारा शांत व सुगंधित असावा.
हे स्थान नि:शब्द असावे. श्वापदांची गर्दी नसावी. पोपट, भ्रमर नसावेत. हंस, चक्रवाक, एखादा कोकिळ चालेल.निरंतर नाही, तरि आली गेली काही,होतु का मयूरेही, आम्हा ना न म्हणो।
अशा या स्थानात एखादा निगूढ मठ असावा. जवळच एखादे शिवाचे देऊळ असावे. अशा ठिकाणी मन स्थिर होते. या ठिकाणी बसून साधकाने चिंतन करावे. त्याचे आसन कसे असावे, याचेही मार्गदर्शन ज्ञानेश्वरांनी केले आहे. ते फार उंच नसावे. निम्न असावे. अशा आसनी बसून साधकाने चिंतन, मनन करावे.