मराठी वर्षातील महत्त्वाचा कालावधी म्हणजे चातुर्मास. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. या कालावधीतील पहिला महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिना पूर्वी ‘नभस्’ या नावाने ओळखला जात असे. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते. तसेच श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. श्रावणात अनेक व्रते आचरली जातात. यातील सर्वाधिक महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात आणि सांगता सोमवारी होत आहे. पहिल्या श्रावणी सोमवारचा शुभ मुहूर्त, शिवामूठ आणि शिवपूजनाची सोपी पद्धत जाणून घेऊया... (First Sawan Somwar 2021 Dates)
श्रावणी सोमवार: शिवपूजनात बेलाचे पान इतके महत्त्वाचे का असते? जाणून घ्या
पहिला श्रावणी सोमवार ०९ ऑगस्ट २०२१ रोजी असून, या दिवशी तांदूळ शिवामूठ म्हणून वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते, असे सांगितले जाते. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. तसेच श्रावणात शिव प्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते. (shivamuth on pahila shravani somvar)
श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती? पाहा, शिवमुष्टी व्रताची परंपरा
शिवपूजन कसे करावे?
श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे, असे सांगितले जाते. पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' असा मंत्र म्हणावा.
यंदाच्या श्रावणात पाच श्रावणी सोमवार; पाहा, शुभ योग, शिवामूठ आणि मान्यता
श्रावणातील पुढील सोमवार कधी?
यंदाच्या वर्षी दुसरा श्रावणी सोमवार १६ ऑगस्ट, तिसरा श्रावणी सोमवार २३ ऑगस्ट, चौथा श्रावणी सोमवार ३० ऑगस्ट आणि पाचवा श्रावणी सोमवार ६ सप्टेंबर रोजी आहे. पहिल्या श्रावणी सोमवारचे विशेष म्हणजे याच दिवशी श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे.