First Shravan Somwar 2024: भारतीय संस्कृती आणि परंपरा या प्राचीन काळापासून अव्याहतपणे सुरू आहेत. काळानुरूप त्यात अनेक सुधारणा झाल्या असल्या तरी त्या साजरे करण्याचे उत्साह कमी झालेला नाही. तसेच त्याचे महत्त्व आणि महात्म्यही कमी झालेले नाही. भारतीय सण, व्रते ही निसर्गानुरुप आहेत. तशीच ती आरोग्यकारकही आहेत. मराठी वर्षात चातुर्मासाचे महत्त्व वेगळे आहे. यात आषाढानंतर श्रावण मास येतो. श्रावण मास अनेकार्थाने विशेष मानले जातो. श्रावण मासातील पहिला श्रावणी सोमवार केव्हा आहे? या दिवशी कोणती शिवामूठ वाहावी? शिवपूजन कसे करावे? याबाबत जाणून घेऊया...
श्रावण मास फारपूर्वी ‘नभस्’ नावाने ओळखला जायचा. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते. श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. श्रावणातील प्रत्येक दिवशीचे व्रत आणि त्याचे महात्म्य अनन्य साधारण असेच आहे. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावणात जिवतीची पूजा केली जाते. तसेच अन्य अनेक सण, उत्सव साजरे केले जातात. श्रावणात सोमवारी केले जाणारे शिवपूजन पुण्य फलदायी मानले गेले आहे. ०९ ऑगस्ट २०२४ रोजी चातुर्मास श्रावण मासातील पहिला श्रावणी सोमवार आहे. या वर्षीचे विशेष म्हणजे श्रावण मासारंभ श्रावणी सोमवारने होत आहे.
शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकाला वेगळे महत्त्व
श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकाला वेगळे महत्त्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. श्रावणात शिव प्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते. मात्र, तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच रुद्राक्ष धारण करावा.
यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी?
श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहावी. तांदूळ शिवामूठ वाहताना, 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' असा मंत्र म्हणावा. अनेक ठिकाणी हे व्रत १४ वर्षे करून त्यानंतर यथासांग, यथाशक्ती त्याचे उद्यापन करावे, असे म्हटले आहे. श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते.