आपल्या जीवनात अनेक घटना घडत असतात. कडू गोड अनुभव येतात. प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवून जातात. जीवनात परिवर्तन घडवून आणतात. भक्तांच्या जीवनात कोणतेही प्रसंग येवोत, त्याला ते ईश्वराची कृपा मानतात. आपल्याला प्रत्येक पावलागणिक भगवंत मार्गदर्शन करत असतो, फक्त तो ओळखता यायला हवा. जगद्गुरु शंकराचार्यांना एका वाटसरूच्या रूपाने भगवंत भेटला आणि त्यानेच शंकराचार्यांना अद्वैताची व्याख्या समजावून सांगितली.
एकदा उत्तर प्रदेशातील काशीच्या मणिकर्णिका घाटावर आदि शंकराचार्य आपल्या शिष्यांसमवेत चालले होते. दुपारची वेळ होती. त्यांना पूजा करायची होती. तेवढ्यात समोरून एक वाटसरू आला. तो दिसायला फारच भेसूर होता. काळाकभिन्न आणि राकट, धिप्पाड शरीरयष्टीचा! सोबत चार कुत्री होती. त्याने शंकराचार्यांचा मार्ग अडवला. शंकराचार्यांनी त्याला वाट सोडण्यास सांगितले.
आदिशंकराचार्य हे साधारण संन्यासी नव्हते. अद्वैत सिद्धांत मांडणारे व त्यावर शेकडो ग्रंथांची रचना करणारे ते जगद्गुरु होते. ईश्वर एक असून सर्व दिशात तोच एक भरून उरला आहे, हे अद्वैत तत्वज्ञान त्यांनी मांडले होते.
वाटसरू म्हणाला, `महाराज, मी असे ऐकले आहे, की तुम्ही अद्वैत सिद्धांत मांडणारे मोठे तत्वज्ञ आहात. संपूर्ण विश्वात परब्रह्मच व्यापलेले आहे, मग कोणी तुमची वाट अडवली? आणि कोण बाजूला होणार? मला तर हे समजले नाही, की तुम्ही देहाला बाजूला हो म्हणून सांगितले, की देहात आत्मरूपाने राहणाऱ्या देहीला? तुम्ही जर मला देहाने बाजूला हो सांगत असाल, तर तुमचा देह सुद्धा पाच तत्वांचाच बनलेला आहे आणि माझा देहसुद्धा पाच तत्वांचाच बनलेला आहे. मग भेदभावाला वावच कुठे राहिला? आणि जर तुम्ही आत्म्याला बाजूला हो म्हणून सांगत असाल, तर तुमचा आणि माझा आत्मा एकच आहे.
आपल्यासारखा थोर संन्यासी आपल्यात आणि माझ्यात भेद मानत असेल, यावर माझा विश्वासच बसत नाही. आपल्याला माहीत असेलच, की सूर्याचे प्रतिबिंब दूषित पाण्यात पडो, अथवा शुद्ध गंगाजलात, सूर्याच्या अस्तित्वावर काही फरक पडतो का? जर सूर्यामध्ये कोणताही दोष निर्माण होत नाही, तर एका देहातला आत्मा दुषित कसा असू शकतो?
आदि शंकराचार्य कल्पनाही करू शकत नव्हते, की एक वाटसरू अद्वैताची एवढी सुंदर व्याख्या करू शकेल. शंकराचार्य भावविभोर झाले. ते म्हणाले, `या अद्वैत परमात्म्याला संपूर्ण विश्वात जो अशा प्रकारे पाहू शकतो, तो सामान्य वाटसरू असला, तरी वंदनीय आहे.' असे म्हणत शंकराचार्यांनी वाटसरूचे पाय धरले.
परंतु त्याक्षणी ना तिथे वाटसरू होता, ना चार कुत्री! जणू काही भगवान दत्तात्रेय वाटसरूच्या रूपाने येऊन शंकराचार्यांना अद्वैताची व्याख्या समजावून गेले.