एका गावात मुख्य रस्त्यावर न्याहारीची अनेक दुकाने असतात. तिथला पोहेवाला अतिशय प्रसिद्ध असतो. पोह्यांबरोबरच अन्य पदार्थही चविष्ट मिळत असत. परंतु, त्याच्याकडचे स्वस्त आणि मस्त पोहे खायला रोज सकाळी लोक अक्षरश: तुटून पडत असत.
त्याच्या दुकानाच्या बरोबर समोर एक ज्यूस सेंटर असते. सकाळी त्याच्याकडे विशेष गर्दी नसल्याने तो रोज पोहेवाल्याच्या दुकानाचे अवलोकन करत असे. या रोजच्या निरीक्षणातून एक बाब त्याच्या लक्षात आली, ती म्हणजे एक माणूस दररोज गर्दीचा फायदा घेत त्याच्याकडे फुकटात पोहे खाऊन जातो. ही बाब लक्षात आणून देण्यासाठी ज्यूसवाल्याने आजही पाळत ठेवली आणि तो माणूस गर्दीतून पोहे खाऊन पसार होणार त्याआधीच ज्यूसवाल्याने पोहेवाल्याला फोन केला आणि निळ्या शर्टमधल्या माणसाची हकीकत सांगितली.
पलीकडून काही कारवाई होण्याऐवजी पोहेवाला म्हणाला, 'हो मला कल्पना आहे.'ज्यूसवाला म्हणाला, `पण मग तुम्ही त्याला पकडत का नाही?'पोहेवाला म्हणाला, `गर्दी ओसरू दे, मग दुपारी निवांत भेटून सांगतो.'
दुपार झाली. पोहेवाल्याकडची ग्राहकांची गर्दी ओसरल्यावर तो आपणहून ज्यूसवाल्याकडे गेला आणि फुकटात पोहे खाणाऱ्या माणसाबद्दल सांगितले.पोहेवाला म्हणाला, `तो माणूस रोज सकाळी माझ्या दुकानासमोर बसतो. माझ्या दुकानात गर्दी होण्याची वाट पाहतो आणि गर्दीत घुसून पोहे खाऊन जातो.'ज्यूसवाला म्हणाला, `मीसुद्धा तेच तर सांगतोय, मग तुम्ही त्याला पकडले का नाही?'
यावर पोहेवाला म्हणाला, `कारण, तो रोज फुकटात पोहे मिळावे म्हणून माझ्या दुकानात गर्दी व्हावी अशी प्रार्थना करत होता. त्याच्यामुळे माझ्या दुकानाची भरभराट होत आहे असे मी समजतो. त्याच्या स्वार्थामध्ये माझ्यासाठी प्रार्थनाभाव दडलेला आहे आणि त्याचा मलाच लाभ होत आहे, म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो....!'
वाईटातून चांगले पाहण्याची किती मोठी शिकवण आहे ही! पण आपण कधीच या दृष्टीने विचार करतच नाही. आपण नेहमी ज्यूसवाल्याच्या जागी उभे राहून विचार करतो. चला तर आपणही पोहेवाल्याच्या जागी उभे राहून विचार करायला शिकूया आणि कोणाला तरी एक प्लेट पोह्यांचा फुकट आस्वाद घेण्याची मुभा देऊया!