तळहाताच्या रेषा केवळ आपले भाग्य, व्यक्तिमत्त्व यांच्या निदर्शक नाहीत तर त्या आजारांबद्दलही भाकीत करतात. सद्यस्थितीत ६० टक्क्याहून अधिक लोक नैराश्यग्रस्त आहेत. पण हा एक प्रकारचा आजार आहे आणि तो वेळेवर उपचार केले असता बरा होऊ शकतो हे लोकांना पटत नाही. म्हणून ते चिकित्सा करायलाही घाबरतात. हस्तरेषाकार सांगतात, यासाठी तुम्ही स्वतःची चाचणी करून तळहाताची स्थिती, रेषा आणि खुणा यावरून स्वतःचे जुजबी परीक्षण करा.
नैराश्याबद्दल कसे जाणून घेता येईल?
सतत कंटाळा येणे, आळस येणे, झोपून राहावेसे वाटणे, कोणाशीही न पटणे, एकांतात, अंधारात राहावेसे वाटणे, वरचेवर रडू येणे, अतिसंवेदनशील होणे, शीघ्रकोपी होणे अशी नैराश्याची प्राथमिक लक्षणे सांगितली जातात. काही जणांसाठी ही स्थिती क्षणिक असते तर काही जणांसाठी दीर्घकालीन. यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. कारण शारीरिक व्याधी लवकर बऱ्या होतीलही परंतु मानसिक व्याधींमधून बाहेर पडण्यासाठी स्वयंप्रेरणा महत्त्वाची असते.
या वैद्यकीय सूचनांबरोबर हस्तरेषेच्या अभ्यासाची जोड देऊया. हस्तशास्त्र ज्योतिष या संदर्भात काय सांगते पहा -
हातावरील प्रमुख रेषा वगळता अन्य रेषांमध्ये बदल होत राहतात. कधीकधी तळहातावर एखादे चिन्ह किंवा आकार तयार होतो आणि नंतर तो काही काळाने निघून जातो. या खुणा किंवा हे बदल आपल्याला आरोग्याशी निगडित सूचना देत असतात. त्या कशा ओळखायच्या ते पाहू-
- जर एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही तळव्याची त्वचा वारंवार कोरडी आणि खडबडीत होत असेल आणि त्याच्या बोटांचा पुढचा भाग कोरडा व अंगठा समोरून काहीसा सपाट झाला असेल तर ती व्यक्ती नैराश्यात असल्याची चिन्हे आहेत. नैराश्यातून बाहेर आल्यावर तळहाताची त्वचाही मऊ होऊ लागते.
- ज्या व्यक्तीच्या हातात मस्तिष्क रेषा खालच्या दिशेने झुकलेली असते ती व्यक्तीही आयुष्याच्या काही टप्प्यावर नैराश्याची बळी ठरू शकते.
- तसेच मस्तिष्क रेषा झुकलेली आणि हृदयाच्या ओळीशी जोडली गेली असेल तर त्या व्यक्तीला मोठी मानसिक समस्या होऊ शकते. अशा व्यक्तीने वेळेवर उपचार घेणे आवश्यक आहे.
- मधल्या बोटाला जोडून तळहातावर असलेल्या उंचवट्यावर फुली असेल तर तेही नैराश्याचे लक्षण आहे. फुली जस जशी विरत जाते, तसा तणाव हलका होत जातो आणि व्यक्ती नैराश्यातून बाहेर येते.
- ज्यांच्या हातावर रेषांची गुंतागुंत दिसते, असे हात अनेक समस्यांना सामोरे जाणार असल्याचे लक्षण आहे. याउलट ज्यांच्या तळ हातावरील रेषा स्पष्ट, ठळक आणि मोजक्या असतात असे हात भाग्यवान असतात आणि त्यांना तणावग्रस्त जीवनातून वेळेत बाहेर पडता येते.