ज्योत्स्ना गाडगीळ
'कर भला, सो हो भला' अशी आपल्याला शिकवण दिली जाते. शिकवण नव्हे, तर हा संस्कारच! यापुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण तर सांगतात,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।
तुम्ही चांगले काम करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या कामाची नोंद घेण्यासाठी स्वर्गामध्ये चित्रगुप्त बसले आहेत. ते योग्य वेळी योग्य फळ तुम्हाला देतील. तोवर तुम्ही तुमचे कर्म करत राहा.
परंतु, बऱ्याचदा आपल्याला चांगले काम करूनही वाईट अनुभव येतात. मग दुनियादारी नकोशी होते आणि सत्कर्मावरून विश्वास उडून जातो. मात्र, हीच ती वेळ असते, स्वत:शी प्रामाणिक राहण्याची. आपण जर स्वत:ची फसवणूक केली, आपल्या कामाशी प्रतारणा केली, तर त्याचे फळ आपल्यालाच भोगावे लागते. म्हणून प्रत्येक काम इमानदारीने आणि स्वत:शी प्रामाणिक राहून करा, त्याचे फळ आज ना उद्या मिळाल्यावाचून राहणार नाही. हेच सांगणारी छानशी बोधकथा!
हेही वाचा : चला, आजीची सुई शोधुया
एक युवक असतो. अत्यंत हुशार, सुस्वभावी, प्रामाणिक, मेहनती परंतु अतिशय गरीब. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून, शिष्यवृत्ती मिळवून त्याने आपले अभियांत्रिकीचे प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, हवी तशी नोकरी त्याला मिळत नव्हती. त्यामुळे घरचे दारिद्र्यही दूर होत नव्हते. नोकरी नाही त्यामुळे छोकरीही नाही. तरीदेखील, त्या युवकाने काम मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले.
एक दिवस त्याला ओळखितल्या एका बिल्डरकडून एका जुन्या वसाहतीचे पुनर्वसन करण्याचे काम मिळाले. नशीबाचे दार उघडले. तो खुश झाला. त्याने वसाहतीची बारकाईने पाहणी केली आणि नवीन वसाहतीचे स्वरूप कसे असेल, याची आखणी केली.
त्या वसाहतीत बहुतांशी वृद्ध जोडपी राहत होती. युवकाने नवीन वसाहतीचा आराखडा त्यांच्यासमोर ठेवला. सर्व जोडप्यांचे एकमत होईना. प्रत्येकाची मागणी ऐकून घेत, युवकाने नवीन आराखडा तयार केला. सर्वांना दाखवला. सर्वांची पसंती मिळाली आणि कामाचा श्रीगणेशा झाला.
युवकाने जातीने हजर राहून कामाची पाहणी केली. उत्तम प्रतीचे सिमेंट, वीटा, दगड, लोखंडी सळ्या, पाईप इ. बांधकाम निगडित वस्तुंची यादी केली. बिल्डरने दुजोरा दिला. आर्थिक पाठबळ मिळाले. त्यामुळे दर्जेदार कामाची सुरुवात झाली. युवकाची मेहनत आणि नवी वसाहत आकार घेत असल्याचे पाहून वसाहतीतील जुने लोक आनंदून गेले. त्या युवकाशी सर्वांची चांगली गट्टी जमली. आणि त्याच्याशी बोलताना आर्थिक स्थितीबद्दल माहिती मिळाली.
वसाहतकरांनी एक शक्कल लढवली. आपल्याच वसाहतीत त्यांनी आणखी एक छोटेसे घर बांधून मागितले. त्या घराचे काम बिल्डरच्या अखत्यारित नव्हते. परंतु वसाहतीतल्या लोकांनी त्या घरासाठी पैसा उभा करणार असे सांगितले. फक्त ते काम याच युवकाच्या देखरेखित व्हावे, असा सर्वांनी आग्रह केला. युवकाने प्रामाणिकपणे, तेवढ्याच मेहनतीने शेवटचे घरही बांधून पूर्ण केले. नवीन वसाहतीसकट त्या घराची चावीदेखील वसाहतीच्या लोकांच्या स्वाधीन केली. युवकाला त्याच्या कामाचा चांगला मोबदला बिल्डरकडून मिळाला होताच, परंतु त्याच्या चांगल्या वागणुकीचे, प्रामाणिकपणाचे आणि अविश्रांत घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून वसाहतीतल्या लोकांनी जादा बांधून घेतलेले घर युवकाच्या नावे केले आणि घराची चावी त्याला सुपूर्द केली.
भाग्योदय झाला, की रंकाचा राव होतो. परंतु, त्यासाठी आपले सत्कर्माचे पारडे जड असावे लागते. निरपेक्षपणे केलेली सेवा निश्चितच फळते, फक्त कधी, याची वाट न पाहता, कर्म करत राहायचे असते.
हेही वाचा : ...त्याला जगातील कुणीही इजा करू शकत नाही; गौतम बुद्धांचा शिष्य 'पूर्णा'ची गोष्ट