शेगावचे संत गजानन महाराज हे खरोखर एक अलौकिक संत त्यांना अवलिया म्हटलं जायचं. अशा अवलियाला एका ठिकाणी बांधून ठेवणे अशक्य. महाराजांचा मुक्काम शेगावात होता मात्र ते सगळ्या भक्तांच्या नजरा चुकवून त्यांच्या इच्छित स्थळी जात असत. असेच एकदा महाराज गेले.
उन्हाळ्याचे दिवस होते. विदर्भातला उन्हाचा तडाखा सर्वांनाच माहीत आहे. उन्हाळ्यात मैलोन मैल शिवारात कुठेही पाण्याचा थेंब सापडत नाही. नदी-नाले विहिरी आटलेल्या असतात. झाडांची पानगळ झालेली असते. एक भकास असे चित्र असते. अशाच शिवारातून महाराज निघाले आणि अकोट तालुक्याच्या शिवारातून ते जात होते. त्यांनी पाहिलं एका शेतामध्ये एक शेतकरी भर उन्हामध्ये काम करत होता. महाराजही चालून चालून थकले होते. त्यांना तहान लागली. त्यांनी त्या शेतकऱ्याला थोडे पाणी मागितले. त्याआधी महाराजांनी सर्वत्र कुठे पाणी मिळतं का याचा शोध घेतला. मात्र कुठेही पाणी नव्हते. मग त्या शेतकऱ्याला त्यांनी पाणी मागितले. शेतकरी काम करत होता. त्याने बघितल की एक दिगंबर मूर्ती ज्याला वेडा पिसा म्हणता येईल, मात्र शरीराने धडधाकट असतानाही आपल्याला पाणी मागत आहे.
ओढ्यातील गढूळ पाण्यात पितांबराने गजानन महाराजांचा तांब्या बुडवला, अन्...
साहजिकच शेतकऱ्याला राग आला. धडधाकट दिसतो आणि मी शेतात राबत असताना त्याला का पाणी देऊ? आधीच गावांमधून एक घागर डोक्यावर भरून आणलं. त्यातलं पाणी याला दिलं तर मला काय राहील, असा शेतकऱ्याने मनात विचार केला आणि त्याने महाराजांना म्हटले, 'तू नंगा धूत दिगंबर , तुझ्यासारख्या धडधाकट माणसाला पाणी पाजून मला पुण्य मिळणार नाही. अनाथ पंगू दुबळा यांना पाणी पाजून पुण्य मिळाले असते मात्र तुला पुन्हा पाणी देऊन मला काय मिळणार? जा पाणी मिळणार नाही.'
…अन् गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीवरची शितं खाल्ली!
महाराजांनी हे वाक्य ऐकले आणि थोडेसे स्मित हास्य करून ते पुढे निघाले. त्या शेतामध्ये एक विहीर होती. विहीर महाराजांना दिसताच महाराज विहिरीकडे जाऊ लागले. महाराजांची ती कृती पाहून तो शेतकरी म्हणाला, 'अरे वेड्या, तिकडे कशाला जातो ती विहीर कोरडी ठणठणीत आहे. या संपूर्ण शिवरामध्ये एकही विहीर पाण्याची नाही. महाराजांनी ते ऐकले आणि त्या शेतकऱ्याकडे पाहून म्हणाले की, मी माझ्या परीने प्रयत्न करतो. पाणी मिळेलच. महाराज त्या विहिरीच्या काठावर पोहोचले. महाराजांनी क्षणभर ध्यान केले आणि तेवढ्यात त्या विहिरीमधील एका झऱ्यातून पाण्याची कारंजी उडू लागली. तो जरा जिवंत झाला. पाण्याची कारंजी विहिरीच्या बाहेर होऊ लागली. झऱ्याला धार आली. शेतकरी आश्चर्यचकीत होऊन पाहात राहिला. तो धावत धावत विहिरीच्या काठावर पोहोचला, तोपर्यंत विहीर पाण्याने चांगलीच भरली होती. भर उन्हात गेल्या वीस वर्षांपासून कोरडया असलेल्या विहिरीला आलेले पाणी पाहून त्या शेतकऱ्याला लक्षात आले की ही नक्कीच मोठी विभूती आहे. आपण ज्याला वेडा समजलो तो वेडा नसून एक अलौकिक महात्मा संत आहे.
"मी गेलो ऐसे मानू नका। भक्तीत अंतर करू नका ।"
त्या शेतकऱ्याने महाराजांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. महाराज म्हणाले, 'अरे वेड्या, तुझ्यासाठी ही विहीर पाण्याने भरून दिली, आता छान मळा लाव. मात्र शेतकऱ्याला महाराजांची प्रचिती कळली होती. महाराजांचे पाय घट्ट धरत शेतकरी म्हणाला, 'आता याच चरणी लीन होईल मी आता भक्तीचा मळा लावेन.' तो शेतकरी म्हणजे पुढे महाराजांचे पट्टशिष्य ठरलेले भास्कर महाराज पाटील जायले.
आजही अकोल्याच्या अकोट तालुक्यातील शेत सर्व्हे नं. ५२ मध्ये महाराजांनी सजल केलेली विहीर महाराजांच्या चमत्काराची साक्ष देत आहे.