संत गजानन महाराज महाराष्ट्राची विदर्भ पंढरी शेगाव येथे माघ वद्य सप्तमीला प्रगट होऊन ऋषीपंचमी या तिथीला या जगातून अंतर्धान पावले. पण जाताना त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. जरी मी या जगातून अंतर्धान पावलो तरी..
मी गेलो ऐसे मानू नका। भक्तीत अंतर करू नका ।मला कदापि विसरू नका।। मी आहो येथेच ।।
भक्तांना हा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे की, मी याच ठिकाणी आजही आहे तसाच आहे फक्त तुमच्या अनुभूतींच्या चक्षुंनी तुम्हाला मला अनुभवता आले पाहिजे. आपण भक्तीच्या अंतःकरणाने संत गजानन पाहिले, तर आजही त्यांच्या असण्याचे अनेक दृष्टांत, सिद्धांत आपल्याला अनुभवता येतात, असं भक्तगण सांगतात.
संत गजाननाचे अवतारकार्य हे त्यांच्या जीवन कालखंडामध्ये अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यांच्या लीलांचा जगाला आलेला अनुभव हा सुद्धा खूप महत्त्वपूर्ण ठरतो.
शेगावी माघमासी । वद्य सप्तमी त्या दिवशी।।उदय पावला ज्ञान राशी । पदनताते तारावया।।
असा हा ज्ञानराशी सर्व पतीतांना पावन करण्यासाठी, जगाचा उद्धार करण्यासाठी माझे अवतारकार्य आहे, असा संदेश त्यांनी दिलेला आहे आणि त्याचे वर्णन संत दासगणू महाराज यांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये केलेला आहे. आपल्या जगण्याचं जे तत्त्व आहे, त्यामध्ये आत्मा म्हणजे गण तत्त्व असून दुसरा जीव हे ब्रह्म तत्त्व आहे. ते एक असून त्यामध्ये कोणताही भेद नाही, हे महत्त्वाचं तत्त्वज्ञान ते आपल्या प्रसिद्ध भजनातून सांगत असतात. ‘गण गण’ हे त्यांचे भजन कायमच चालले म्हणून त्यांना गजानन हे नाव पडले. संतांच्या येण्याची कारणे निश्चित आहेत. आल्यानंतर त्यांचं अस्तित्व आहे ते कोणत्या स्वरूपात आहे तर.
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापून उरले ते या जगताशी।।ते तू तत्व खरोखर निसंशय असशी। लीला मात्रे धरिले मानवदेहाशी।।
देह धारण करून ते ब्रह्म तत्त्व आपल्या जगण्याचा मूळ स्वरूप आहे असे प्रतिपादन गजानन महाराजांच्या आरतीमध्ये दासगणु महाराजांनी केले आहे.
आपली निष्ठा असेल आणि आपला संतांच्या अवतारकार्यावर विश्वास असेल तर आपल्या मनातील शंका कुशंकांना थारा राहात नाही.
गजाननपदी आपली निष्ठा ठेवा ।।सुखद अनुभव सर्वदा घ्यावा ।।मी गेलो ऐसे मानू नका। भक्तीत अतर करू नका।।कदा मजलागी विसरू नका। मी आहे येथेच ।।
संत गजानन महाराज या जगात कल्याणाच्या दृष्टीने मानव देहधारी एक अवलिया हे शेगांव गावांमध्ये प्रकट होऊन आपल्या प्रकट दिनानिमित्त विविध लीला करतात. त्यामध्ये कोरड्या विहीरीला पाणी आणण्याची लीला असेल, वठलेल्या आंब्याला पाने आणण्याची लीला असेल, अन्यथा जानराव देशमुखांची व्याधी हरून मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्याचा प्रसंग असेल. ह्या सर्व लीला गजानन प्रसाद मानलं तर त्याला कार्यकारणभाव कथा ठरतात व त्यावरती विश्वास ठेवून पुढे आल्यास त्या प्रकारचे अनुभव भक्तांना आजही सदोदित येत असतात.
श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव ‘सर्वेत्र सुखिन: सन्तु सर्वे भवन्तु सुखिन:’ या तत्त्वानुसार कार्य करीत असताना, त्यांनी हाती घेतलेली लोकहिताची कामं आणि त्या कार्याला येत असलेली अपार सिद्धी गजाननाचे अस्तित्व अधोरेखित करते. सेवा परमो धर्म:।। या तत्त्वानुसार त्याचा सर्वसामान्य भक्तांना मिळत असलेला फायदा यातून हेच सिद्ध होते की, महाराजांचे अस्तित्व आजही या शेगाव नगरीत आहे आणि या कार्याचा अनुभव अनेकांना येत आहे. ते कार्य प्रत्येकाने सेवाकार्य म्हणून समजून घेतले तर त्यांच्या जीवनामध्ये कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाटतो.
संत हे एका विशिष्ट कारणाने येतात आणि कार्यसिद्धी करून या जगातून आपले कलेवर घेऊन जातात. एखादी आई आपल्या मुलाला या जगामध्ये चालायला शिकवते, अगदी त्याचप्रमाणे त्यांचे कार्य जगाला तत्त्वांची अनुभूती देऊन शिकवत असते.
संत तुकाराम महाराज म्हणतात- अर्भकाचे साठी। पंते हाती धरली पाटी। तैंसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी।। बालकाचे चाली माय पाऊल घाली।। तुका म्हणे नाव उदका धरनी ठाव।। अशा प्रकारचे वर्तन असते आणि त्यांच्या लीला असतात. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- येथ वडील जे जे करती। त्या नामु धर्म ठेविती।।
संतांनी जगाला योग्य मार्ग दाखवून अवतारकार्य केले आहे. त्यांच्या अवतार कार्याचा अनुभव आजही येत असतो. आज कोरोनाच्या या आरोग्य संकट काळात मंदिरं जरी बंद असली, तरी तो गजानन येथेच आहे. म्हणून आज लॉकडाऊनमध्येही मंदिरासमोर प्रदक्षिणा घालून त्यांच्या अस्तित्वाची साक्ष पटवून देताना भक्त दररोज दिसतात. यातून एकच भाव सार्थ ठरतो. गजाननाच्या अद्भुत लीला। अनुभव येतो आज मितीला।। जाऊनि गजानना। दु:ख त्या ते करी कथना।।
जय गजानन...!