अलीकडे गणेशोत्सवाचे वाढते इव्हेंटीकरण पाहता सगळ्याच ठिकाणचे गणपती राजा म्हणून संबोधले जातात. कोणी नवसाला पावणारा म्हणून तर कोणाची खूप जुनी परंपरा म्हणून इतिहास व नावलौकिक आढळतो. सगळे जण तासन तास रांगेत उभे राहून बाप्पाचे दर्शन घेतात आणि आपण कुठेच न गेल्याची खंत वाटू लागते. अशा वेळी धर्मशास्त्राने सांगितलेले दोन श्लोक सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजेत.
गर्दीत, चेंगराचेंगरीत आपणही उपस्थित राहून भर घालण्यापेक्षा घरी बसून किंवा आपल्या नजीकच्या मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे केव्हाही इष्टच! प्रख्यात मंडळाचा बाप्पा पावतो तसा घरचा बाप्पाही पावतो, फक्त आपली श्रद्धा दृढ हवी. म्हणून दिलेले हे दोन श्लोक लक्षात ठेवा. आपले कर्म करत रहा. त्यापासून ढळू नका. काही कुठे गर्दीत लोटालोटी करून, जीव धोक्यात घालून, देवाचे दर्शन घेण्याची आवश्यकता नाही.
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् |सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||
भावार्थ - ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पाणी शेवटी सागराला जावून मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा शेवटी केशवालाच जावून मिळतो.
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति|तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मन:||
भावार्थ - जो भक्त भक्तीभावाने मला (जे काही) पत्र (पान), पुष्प (फूल), फळ, तोय (पाणी) अर्पण करतो, त्या पवित्र मनाने व भक्तीभावाने अर्पण केलेल्या भेटीचा, मी स्विकार करतो.
आताच्या गर्दीला आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना बाप्पा जबाबदार नाही, कुठे नियोजनाचा अभाव तर कुठे लोकांची बेशिस्त यामुळे सगळ्यांची गैरसोय होते. म्हणून निदान आपण तरी सुज्ञपणे वरील दोन श्लोक लक्षात ठेवून त्यानुसार आचरण करूया आणि शुद्ध भक्तिभाव जागृत ठेवून म्हणूया 'गणपती बाप्पा मोरया!'