Ganesh Chaturthi 2023: लाडक्या गणेशाच्या आगमनासाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. गणेश साहित्यांनी बाजार फुलून गेले आहेत. दरवर्षी कोट्यवधी घरांमध्ये गणरायाचे आगमन होते. केवळ भारतात नाही, तर जगातील अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. गणपतीच्या आवडीचे पदार्थ नैवेद्याला केले जातात. दरवर्षी डेकोरेशनमध्ये वैविध्य आणण्यासाठी सर्जनशीलतेची कसोटी लागते. आपापल्या परिने लाडक्या गणेशाच्या आगमनाची तयारी केली जाते. मात्र, पहिल्या दिवशी पार्थिव गणेशाचे पूजन करताना नेमके कोणते साहित्य लागते? गणपती पूजनाची तयारी कशी करावी? जाणून घ्या... (Ganesh Chaturthi 2023 Puja Sahitya)
श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी श्रींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बाजारातून खाली नमूद केलेल्या गोष्टी आणाव्यात. हे पूजेचे साहित्य निवडून, स्वच्छ करून पूजेच्या थाळीत, तबकांत, टोपल्यात नीट लावून ठेवावे, असे सांगितले जाते. (Ganesh Chaturthi 2023 Ganesh Puja Sahitya)
गणेश पूजनाच्या तयारीसाठी लागणारे साहित्य
- पाट किंवा चौरंग, आसन, आसन वा चौरंगावर ठेवण्यासाठी वस्त्र. रांगोळी, समई, निरांजने, पंचारती, वाती, फुलवाती, आरतीसाठी तबक, उदबत्तीचे घर, धूप लावण्यासाठी स्टॅंन्ड, विड्याची पाने, सुट्टे पैसे, सुपारी, फळे, श्रीफळ, नारळ, नैवेद्य व प्रसाद वाटपासाठी वस्तू (वाट्या, चमचा, तबक इ.)
श्रीगणेश पूजनासाठी लागणारे साहित्य
ताम्हण, पळी-पंचपात्री, अष्टगंध डबी, शेंदूर डबी, बुक्का, हळदकुंकू, गुलाल, फुले, निवडलेल्या दूर्वांची २१-२१ ची बांधलेली जुडी, विड्याची पाने १५, गूळ, खोबरें, पंचामृत- साहित्य (दूध, दही, तूप, मध, साखर) गंध, अत्तर जानवे, उदबत्ती, एकारती, आरतीसाठी पंचारती, कापूर, १ नारळ, खारीक, बदाम, फळे, फुले पुढीलप्रमाणे : लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक. (Ganesh Chaturthi Ganesh Puja Sahitya In Marathi)
पुढील प्रमाणें २१ प्रकारची पत्री :- १) मोगरा. २) माका. ३) बेलाचे पान. (४) दूर्वा. ५) बोरीचे पान. ६) धोत्र्याचे पान. ७) तुळस. ८) शमी. ९) आघाडा. १०) डोरली. ११) कण्हेर. १२) रुई. १३) अर्जुनसादडा. १४) विष्णुकांता. १५) डाळिंब. १६) देवदार. १७) मरुवा. १८) पिंपळ. १९) जाई. २०) केवडा. २१) अगस्तिपत्र.
अन्य साहित्य :- गूळ, खोबरे बारीक किसून खसखस, खडीसाखर, खजूर-बेदाण्यासह पंचखाद्य (वाटी किंवा अधिक प्रसाद वाटण्यासाठी), उकडलेले / तळलेले अगर खव्याचे (पेढे) मोदक - २१ (घरातील परंपरेनुसार नैवेद्यासाठी मोदक), गणपतीसाठी लाल/भगव्या रंगाचे नवीन वस्त्र. अन्य साहित्य आपापल्या परंपरा, कुळाचार, कुळधर्म यांप्रमाणे घ्यावे, असे सांगितले जाते.