Ganesh Chaturthi 2023:गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गणपतीची तयारी अगदी अंतिम टप्प्यात आली असून, बाजारातही खरेदीची लगबग सुरू असलेली पाहायला मिळत आहे. भाद्रपद महिना म्हटला की, केवळ आणि केवळ आठवतो तो गणेशोत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. यंदा, १९ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीगणेश चतुर्थीपासून पुढे १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जाईल. कोट्यवधी घरात गणपती बसवला जातो. अनेक ठिकाणी पारंपरिक किंवा ठरलेली गणेशमूर्ती स्थापन केली जाते. मात्र, काही जण नाविन्य म्हणून दरवर्षी वेगळ्या प्रकारची गणपती मूर्ती आणतात. मात्र, उजव्या सोंडेचा बाप्पा यंदा आणणार असाल, तर शास्त्र काय सांगते, ते जाणून घेऊया... (Ujvya Sondecha Ganapati)
केवळ देशात नाही, तर परदेशातील अनेक ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. यंदा मंगळवारी गणपती आहेत. त्यामुळे अतिशय दुर्मिळ, अद्भूत आणि शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. या शुभयोगात गणपतीची स्थापना पुण्य-फलदायी, लाभदायी मानली गेली आहे. मात्र, उजव्या सोंडेच्या गणपतीबाबत काही मान्यता आणि समजुती असल्याचे पाहायला मिळते. (Ujvya Sondecha Ganpati Murti)
उजव्या सोंडेचा गणपती आणावा की नाही?
पूर्वापार चालत आलेल्या उजव्या सोंडेच्या मूर्तीच्या आराधनेमागे असलेली भक्ती बऱ्याचदा प्रेमापोटी नसून भीतीपोटी असल्यामुळे त्यातून अनेक अपसमजुती प्रचलित होतात. उदा. कडक आचार न पाळल्यास उजव्या सोंडेचा गणपती सर्वनाश करतो, सिद्धिविनायक घरात ठेवू नये, उजव्या सोंडेचा गणपती कडक शिस्तीचा असतो. अशा अनेक अंधश्रद्धा प्रसूत होतात. ज्या घरात उजव्या सोंडेचा गणपती आहे, तिथे काही वाईट अनुभव आल्याचे ऐकिवात नाहीत. सरसकटपणे आपण डाव्या सोंडेचा गणपती पाहिला आहे. एखादी मूर्ती सोंडेची असेल, तरी त्यातले देवत्त्व अजिबात कमी होत नाही. मनोभावे केलेली पूजा बाप्पापर्यंत पोहोचते. मग तो उजव्या सोंडेचा असा नाहीतर डाव्या सोंडेचा.
उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक गणपती
गणपतीच्या सोंडेचे अग्र याच्या उजव्या वरील हाताकडे वळले असल्यास तो सिद्धिविनायक व डाव्या वरील हाताकडे वळले असल्यस तो ऋद्धिविनायक समजला जातो. त्याचप्रमाणे सोंडेचे टोक त्याच्या उजव्या हाताकडे खाली वळले असल्यास तो बुद्धिविनायक व डाव्या हाताकडे खाली वळले असल्यास तो शक्तिविनायक समजला जातो. या चार विनायकांपैकी सिद्धिविनायक मोक्षसिद्धिप्रद समजला जातो. उजव्या सोंडेच्या गणपतीविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात सूक्ष्म तपशीलात्मक असा फारसा ऊहापोह केलेला आढळत नाही. गणेशाच्या निरनिराळ्या ध्यानांमध्येही तसा स्पष्ट उल्लेख आढळत नाही.
उजव्या सोंडेचा बाप्पा कधी घरी आणावा?
जेव्हा विशिष्ट सिद्धी किंवा मोक्षसिद्धिच्या प्राप्तीसाठी गणपतीची आराधना केली जाते, तेव्हा उजवीकडे सोंड असलेला गणपती घेण्याची प्रथा आहे. अशावेळी पार्थिव गणपतीची आराधना केली जाते. या पार्थिव गणेशाच्या आराधनेत स्वहस्ते मृत्तिकेपासून तयार केलेल्या सिद्धिविनायकाचे पार्थिव गणेशाच्या आराधनेत स्वहस्ते मृत्तिकेपासून तयार केलेल्या सिद्धिविनायकाची ध्यानवाहनपूर्वक षोडशोपचार पूजा व त्याचे लगेचच विसर्जन विहित असते. ही पूजा अत्यंत शुचिर्भुतपणे व तंतोतंत विधिविधानपूर्वक करणे आवश्यक असते.
- उजव्या सोंडेच्या गणपतीबाबत अनेक समजुती प्रचलित आहे. मात्र, घाबरून जाण्याचे कारण नाही. कोणतीही भीती, शंका मनात आणू नये, असे सांगितले जाते. आपापल्या रिती, परंपरा, कुळधर्म, कुळाचाराप्रमाणे मनोभावे गणपती पूजन, सेवा करावी. भगवंत आपल्या भक्ताचे कधीच वाईट चिंतीत नाही. लेकरांप्रमाणे तो आपला सांभाळ करतो. सद्बुद्धी देतो. त्यात गणपती ही तर बुद्धीची देवता. मनातील शंका दूर करून डोळसपणे भक्ती केली, तर आपल्या मनात भगवंताप्रती आदरयुक्त भीती, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होत राहील.
गणपती बाप्पा मोरया...!!!