>> ज्योत्स्ना गाडगीळ
आजच्या रिमिक्सच्या काळात प्रत्येक गाण्याला डीजेची जोड देण्याचा बीभत्स प्रकार सुरू आहे. 'चिक मोत्याची माळ' हे लोकप्रिय गाणेदेखील रिमिक्सच्या तावडीतून सुटले नाही. तसे असले तरी आजही मूळ गाणेच श्रोत्यांच्या पसंतीस उतरते. मात्र दुर्दैवाने या गाण्याचे गायक, संगीतकार, कवी यांच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. म्हणून गणेशोत्सवानिमित्त या गाण्याचे मूळ संगीतकार अरविंद हळदीपूर यांच्याशी केलेली बातचीत.
अलीकडे समाज माध्यमाच्या काळात कोणतीही व्यक्ती एका रात्रीत नावारूपास येऊ शकते. कारण व्हायरल होण्याची ताकद या माध्यमात आहे. मात्र ३५ वर्षांपूर्वी कॅसेटच्या जमान्यात एक दोन गाणीच नाही, तर पूर्ण अल्बम हिट होण्याचा रेकॉर्ड केला होता, दोन संगीतकारांनी; त्यांचे नाव आहे संगीतकार अरविंद हळदीपूर आणि प्रख्यात वाद्यवादक निर्मल मुखर्जी! ही जोडगोळी 'अरविंद-निर्मल' या नावाने गाण्यांना संगीत देत असे. 'गणपती आले माझे घरा' या अल्बममधील 'अशी चिक मोत्याची माळ' हे गाणेदेखील त्यांचीच निर्मिती!
अरविंदजी सांगतात, '१९८९ मध्ये गणपतीच्या गाण्यावर अलबम करण्याची मला कल्पना सुचली. माझा सहसंगीतकार निर्मल मुखर्जी याने दुजोरा दिला. आमचा कवीमित्र आणि संगीताचा जाणकार विलास जैतापकर याला गणपतीवर गाणे लिहायला सांगितले. गणपतीचा साज, थाटमाट यावर गाणे लिहावे असे आम्ही सुचवले. गणपतीला खुलून दिसणारी, चिकनाई असलेली अर्थात चकाकणाऱ्या मोत्यांची माळ हा विषय घेऊन विलासने पूर्ण गाणे लिहून काढले. चिक मोत्याची माळ हे गाणे तयार झाले. इतर वेळी संगीतकार चालीवर शब्द लिहून द्यायला सांगतात, मात्र आम्ही शब्दाला अनुसरून चाल बांधली. ते गाणे खुलून येण्यासाठी निर्मल यांनी एक ट्यून तयार केली. ती ट्यून आम्हा सगळ्यांना एवढी आवडली की गाण्याच्या सुरुवातीला, कडव्यांच्या मध्ये आणि शेवटीसुद्धा ती वापरली आहे. ती ट्यून एवढी गाजली, की बॉलिवूडमध्ये त्या ट्यूनवर गाणे तयार करण्याचा प्रस्ताव माझे मित्र जॅकी श्रॉफ यांनी मांडला. तसे झालेही, मात्र ऐन वेळी ते गाणे चित्रपटातून वगळण्यात आले आणि ती ट्यून गणपतीच्या गाण्यापुरती मर्यादित राहिली.'
ते पुढे सांगतात, 'मेलोडी कॅसेट कंपनीतर्फे आम्ही हे गाणे रेकॉर्ड केले होते. गायिका जयश्री शिवराम यांनी हे मूळ गाणे गायले आहे. हेच गाणे पुरुष आवाजात श्रीनिवास कशेळकर यांच्याकडून गाऊन घेतले. गाणे प्रकाशित झाल्यावर तिसऱ्या दिवशीच स्थानिक गणेश मंडळातील गायन स्पर्धेत म्हटले गेले. यावरून त्या गाण्याची लोकप्रियता लक्षात येऊ शकते. हे गाणे रेकॉर्ड झाले तेव्हा माझी मुलगी तीन वर्षांची होती आणि तिने जेव्हा माझ्याकडून हे गाणे ऐकले तेव्हा 'एक नंबर' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली! तीन वर्षांच्या बालिकेला हे गाणे रिझवू शकते तर ते किती लोकप्रिय होऊ शकेल याचा मला त्याक्षणीच अंदाज आला होता आणि झालेही तसेच!'
'चिक मोत्याची माळ' गाण्याचे संगीतकारांना मानधन मिळाले नाही मात्र या गाण्याचे निर्माते म्हणून अरविंद -निर्मल या जोडीला त्या काळात खूप प्रसिद्धी मिळाली. मात्र, एका नामांकित कॅसेट कंपनीने गाण्याचे अधिकार न मागता स्वतःचे गायक, वादक नेमून तेच गाणे पुनःप्रक्षेपित करून आपल्या नावावर प्रसिद्ध केले. केवळ नाममात्र उल्लेख राहिल्याने लोक नव्या गायकांना, संगीतकारांना ओळखू लागले आणि मूळ रचनाकार मागे पडले. एवढेच नाही, तर आजवर या गाण्याच्या जीवावर अनेक गायकांनी, संगीतकारांनी अमाप पैसे मिळवले, पण दुर्दैव म्हणजे कोणीही मूळ कलाकारांचा उल्लेखही केला नाही. म्हणूनच अरविंदजी हेच गाणे स्वतःच्या मालकी हक्कासह ते पुनःप्रक्षेपीत करण्याच्या विचारात आहेत.
या अल्बमचे वैशिष्ट्य असे, की या अल्बमची सगळी गाणी सुपरहिट झाली. चिक मोत्याची माळ या गाण्याच्या यशानंतर त्यांनी विलास जैतापकर यांच्याकडून बाप्पाचे धूमधडाक्यात स्वागत करणारे गाणे लिहून मागितले आणि जन्म झाला आणखी एका धमाल गाण्याचा! सुरेश वाडकर यांच्या आवाजात 'सनईचा सूर' हे गाणे खूप गाजले. गावाकडची गौराईची परंपरा पाहता 'बंधू येईल माहेरी न्यायाला' हे गाणे तयार केले, तेही हिट झाले. साईबाबांवर एक गाणे करायचे ठरले, त्यावेळचा एक मजेशीर किस्सा अरविंदजींनी सांगितला, 'त्यांच्या गावात साई मंदिराबाहेर एक माणूस मद्यधुंद अवस्थेत साईबाबांशी गप्पा मारायचा, 'देवा आमच्यावर लक्ष ठेवा, कुठेही राहू सुखी ठेवा' हेच शब्द आवडले आणि आम्ही त्याचे गाणे केले, 'देवा हो देवा लक्ष ठेवा' त्या गाण्यालाही लोकांची पसंती मिळाली. त्यानंतर कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेले तसेच अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देणारे 'आली चतुर्दशी' हे गाणेही खूप गाजले. अरविंद - निर्मल या जोडगोळीने आणखीही चार गणपतीच्या गाण्याचे अलबम केले. त्यातले 'ग गणपतीचा' हे गाणे आजही गणेशोत्सवात वाजवले जाते.
या सगळ्या गाण्यांना मिळालेली प्रसिद्धी ही तर गणपती बाप्पाची कृपा, असे अरविंदजी नम्रपणे नमूद करतात. मात्र या प्रवासात कवी विलास जैतापकर आणि सहसंगीतकार निर्मल मुखर्जी यांची साथ कायमची सुटली याची खंत व्यक्त करतात. त्यावेळी फोटो काढण्याचे फॅड नसल्याने अमिताभ बच्चन पासून ते लता दीदींपर्यंत सर्व कलाकारांबरोबर काम करूनही फोटोरुपी आठवणी त्यांच्याकडे नाहीत, पण त्यांच्या समवेत जगलेले क्षण मनात कायम स्वरूपी राहतील असे ते म्हणतात.
अरविंद निर्मल या संगीतकारांच्या जोडीने या गाण्याच्या रूपाने दिलेली अमूल्य भेट यापुढेही सर्व गणेश भक्तांना आनंद देत राहील याची खात्री आहे, फक्त कालौघात या मूळ रचनाकारांची नावे विस्मरणात जाऊ नये हीच बाप्पा चरणी प्रार्थना!