अलीकडे उत्सावाचे बदलते स्वरूप आणि ध्वनी प्रदूषणाचा जनमानसाला होणारा त्रास पाहता, पुण्यात नवी पेठेतील लोकमान्य नगर गणेशोत्सव मंडळाने डीजे न वाजवता बाप्पाची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम नवीन नाही, परंतु सद्यस्थितीचे भान राखून केलेला बदल नक्कीच कौतुकास्पद आहे असे म्हणता येईल.
लोकमान्य नगर ही १९६२ मध्ये म्हाडाने पूरग्रस्तांसाठी वसवलेली जुनी आणि मोठी वसाहत आहे. तिथे गेली अनेक वर्ष पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप जसे लोकमान्य टिळकांना अपेक्षित होते, त्या पद्धतीने लोकमान्य नगरमध्ये अनेक प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिवाय लहान मुलांसाठी पर्यावरण पूरक गणपती बनवणे, स्वसंरक्षणाचे धडे देणे, मोठ्यांसाठी रक्तदान शिबीर आयोजित करणे इत्यादी उपक्रम तिथे राबवले जातात. अशातच यावर्षी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व नागरिकांकडून कौतुक होत आहे.
उत्सवाचा उद्देश हाच मुळात सर्वांना सामावून घेणे हा असतो. मात्र डॉल्बीच्या भिंतींमुळे घराला बसणारे हादरे आणि अश्लील गाण्यांचा सातत्याने कानावर होणारा मारा सहन न झाल्याने लोकांना गणेशोत्सव सुरु होणार म्हटले तरी धडकी भरते. याबाबतीत अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी मध्यंतरी दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. समाज माध्यमांवर त्याबाबत अनेक उलट सुलट चर्चा झाल्या. उत्सवाचे बीभत्स रूप पाहता तो बंद करणे हा त्यावर तोडगा नाही, असे सर्वानुमते म्हणण्यात आले. त्यावर उपाय म्हणून पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गणेश मंडळांना आवाहन केले, की 'आपल्याला खूप मोठा आवाज दीर्घ काळासाठी ऐकावा लागला तर त्रास होतो. त्या आवाजाने आपल्या वसाहतीतील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, आजारी व्यक्तींच्या हृदयाची धडधड वाढते, तब्येत आणखी बिघडते. या सर्वांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. सर्व गणेश मंडळांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आवाजाची मर्यादा पाळावी आणि उत्सवासाठी गाण्यांची डोळसपणे निवड करावी. मोजक्या पारंपरिक वाद्यांची निवड करून हा उत्सव साजरा करावा.'
हे पाहता लोकमान्य नगरच्या मंडळाने घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद ठरेल. अशा उपक्रमाचे सर्व स्तरावर स्वागत आणि अनुकरण झाले तर गणेश उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल हे नक्की!