>> आप्पासाहेब पाटील
सोलापूर : शनिवार ७ सप्टेंबर रोजी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरात गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना व पूजन करता येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तिंची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतर देखील करता येऊ शकतात अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
दरम्यान, मंगळवार १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासून ११ वा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीचे दिवशी विसर्जन केले जाते, त्यांच्याकडे ११ दिवसांचा उत्सव असेल, तसेच या दिवशी मंगळवार म्हणजे गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावे असेही दाते यांनी सांगितले. विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत असतो, त्याप्रमाणे पुढच्या वर्षी गणपती बाप्पा खरंच लवकर म्हणजे २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार आहेत. अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.
गौरी पूजेचा मुहूर्त
१० सप्टेंबर रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर रात्री ८ वाजून ४ मिनिटांपर्यत कधीही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्याह्नी असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने ११ सप्टेंबर रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने १२ सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री ९:५३ पर्यंत गौरी विसर्जन करता येईल.