Ganesh Chaturthi 2024: श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. या चतुर्थीला भारतीय परंपरेत विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणेशोत्सवात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, संपूर्ण दहा दिवस गणपती पूजन करून विसर्जन करण्याची परंपरा आहे.
यंदा, ०७ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. श्री गणेश चतुर्थीला तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्रपटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो, अशी मान्यता आहे. देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणूनच साजरा केला जातो. सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो.
दरवर्षी नवीन मूर्ती आणून का पूजन केले जाते?
श्री गणेश चतुर्थी व्रत हे ‘सिद्धीविनायक व्रत’ या नावाने ओळखले जाते. पूजेत गणपती असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा काही उद्देश सांगितला जातो. श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात. प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यांतून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे, असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
गणेशमूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असावे?
मूर्तीचे मुख पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने ठेवावी. पूजकाने पूजा करतांना स्वतःचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला येणार नाही, अशा पद्धतीने बसावे. पूजा करतांना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच राहील याची दक्षता घ्यावी, असे म्हटले जाते. मूर्तीचे मुख पूर्वेला असल्यास पूजकाने पश्चिमेला मुख करून पूजा न करता मूर्तीच्या उजव्या हाताला उत्तरेकडे तोंड करून बसावे. दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये.
दरम्यान, मूर्ती देवतेच्या मूळ रूपाशी जितकी साम्य असणारी असेल, तितकी ती उपासकाला लाभकारक असते. ऋषीमुनी आणि संत यांनी शास्त्रे लिहिली आहेत. त्यांना देवतांचा जसा साक्षात्कार झाला, तशी त्यांनी देवतांची वर्णने शास्त्रांत केली आहेत; म्हणून शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे मूर्ती बनवावी, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.