हिंदू कालगणनेनुसार चैत्र वैशाखादी मासांमध्ये भाद्रपद हा सहावा महिना! या महिन्याच्या पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर 'पूर्वाभाद्रपदा' हे नक्षत्र येते. त्यामुळे या मासाला भाद्रपद असे नाव प्राप्त झाले. याला नभस्य असे आणखी एक नाव आहे. तर केरळ प्रांतात हा महिना 'अवनी' म्हणून ओळखला जातो. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या 'धर्मबोध' या ग्रंथातून भाद्रपद मासाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
श्रावणापासून ज्या मासाची उत्सुकतेने वाट पाहिली जाते तो हा महिना समस्त हिंदुधर्मीयांच्या, त्यातही मराठी माणसांच्या आनंदाला गणेशभक्तीचे आनंदाला गणेशभक्तीचे उधाण आणण्याचे काम हा भाद्रपद महिना करतो. कारण या महिन्यात भगवान श्रीगणेशाचे घराघरात, चौकाचौकात आगमन होते. शिव पार्वतीचा पूत्र म्हणून श्रीगजाननन गणेशाने भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जन्म घेऊन त्या महिन्याचे महत्त्व वाढवले आहे.
भगवान शिव शंकर आणि देवी पार्वती ही अखिल जगाची पिता माता म्हणून मान्यता पावलेली असली तरी त्यांच्यावर पहिला अधिकार कार्तिकेय आणि श्रीगजाननाचाच! त्यामुळे गणपतीच्या आगमनापूर्वीच म्हणजे भाद्रपद शुक्ल प्रतिपदेपासून पुढे संपूर्ण महिनाभर विविध तिथीला कधी एकत्रितपणे तर कधी भगवान शिवशंकरासाठी, तर कधी माता पार्वतीसाठी अनेक पूजा व्रत विधी सांगितली गेली आहेत. यापैकी हरतालिकेसारखी व्रतेही मनासारखा पती मिळावा म्हणून योजली गेलेली दिसतात. तर गौरी तृतीया, गौरी व्रत, गौरी चतुर्थी, गौरी गणेश चतुर्थी, गौरीचा सण, बृहत्गौरी व्रत, कोटीसंवत्सरव्रत, अमुक्ताभरण अशी काही व्रतेही अधिकाअधिक पुत्रप्राप्ती, संततीच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी रूढ झालेली दिसतात. बहुला चतुर्थी, पूत्रकामव्रत, शिवपार्वतीपूजन, चंद्रषष्ठी व्रत, पुत्रिय व्रत, दुर्गात्रीरात्र व्रत, उमा महेश्वर व्रत ही व्रते गणपतीसारखा गुणी पूत्र आपल्याला देखील व्हावा अशा ईच्छेतून पूर्वापार केली जातात.
याशिवाय महाराष्ट्रात `ज्येष्ठागौरी'चे वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. तीन दिवसांच्या या गौरी व्रतांचा महत्त्वाचा विशेष म्हणजे या गौरीचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर, पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर आणि विसर्जन मूळ नक्षत्रावर केले जाते. या ज्येष्ठा गौरी महालक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गणपतीची आई, अशा वेगवेगळ्या भावनेने पुजल्या जातात. कुलाचाराप्रमाणे त्याचे स्वरूप आणि नैवेद्यही वेगवेगळे असतात. प्रामुख्याने कोकणात तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्याच्यावर देवीचे चित्र असलेल्या कागदाचा मुखवटा बांधला जातो. काही ठिकाणी नदीवरचे पाच खडे गौरी म्हणून आणले जातात. तर कुठे चांदीचा, पितळेचा अथवा शाडूच्या मातीचा मुखवटा असतो. अनेक घरांमध्ये देवीला तिखटाचा नैवेद्य दाखवण्याचा वहिवाट आहे.
भाद्रपदामध्ये इतरही काही विशेष म्हणता येतील अशी व्रत वैकल्ये केली जातात. त्यापैकी एक म्हणजे, भाद्रपद शुद्ध अष्टमीला काही घरांमधून, तसेच अनेक मंदिरातून भागवत पुराणकथनाचा सप्ताह सुरू केला जातो, त्याची सांगता पौर्णिमेला होते. महाराष्ट्रापेक्षा दक्षिणेकडे आणि गुजरात प्रांतात तो अधिक प्रमाणात केला जातो. तसेच या अष्टमीला गुरुवार असेल तर तो गुर्वाष्टमी मानतात. या योगावर गुरुप्रतिमेची पूजा केली जाते.
भाद्रपद पौर्णिमेला इंद्रासाठी विशेष यज्ञ केला जातो. भाद्रपदाचा कृष्ण पक्ष हा `पितृपक्ष' म्हणून पाळला जातो. आपल्या वाडवडिलांच्या श्राद्धकर्मासाठी तो खास राखून ठेवला गेला आहे. या मासात गणपती दहा किंवा अकरा दिवसांचा पाहुणचार घेण्यासाठी येतात. अनंत चतुर्दशीला गावाला परत जातात, तर गौरी तीन दिवसाच्या माहेरपणाला येतात. एकूणच पितरांची आठवण, ऋषींचे स्मरण, व्यासांच्या भागवत पुराणाचे पारायण अशा विविध पातळ्यांना स्पर्श करणारा तसेच देवादिकांसह अखिल चराचराला स्वत:मध्ये सामावून घेणारा हा भाद्रपद महिना सर्वांना आवडतो.