>> मकरंद करंदीकर
७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून (Ganesh Chaturthi 2024) गणेशोत्सव सुरु होत आहे. महाराष्ट्रात घरगुती गणपती हे प्रामुख्याने दीड दिवस, पाच दिवस, गौरी बरोबर आणि अनंत चतुर्दशीपर्यंत असे चार प्रकारचे असतात. त्यात दीड दिवसाचे खूपच मोठ्या प्रमाणावर असतात. हा दीड दिवसाचा का असतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
गणपतीची स्थापना कधी करावी, विसर्जन कधी करावे याची आपल्या धर्मात सुयोग्य व पारंपरिक उत्तरे आहेत. याची माहिती असलेली मंडळी पूर्वी हे सांगत असत व इतर सर्वजण ते श्रद्धेने पाळत असत. आता तर " भिंतीवरी कालनिर्णय " अवतरले आहे. पण कांहीं मंडळी, माध्यमे यावर जाणीवपूर्वक गोंधळ उडवतात असे वाटते.
प्रत्येक दिवशी माध्यान्हीला असलेली तिथी, उदयकालची तिथी, चंद्रोदयाची तिथी, तिथीची वेळ, नक्षत्र इत्यादीच्या हजारो वर्षे केलेल्या अभ्यासावरून निश्चित निर्णय घेतला जातो. सांवत्सरिक श्राद्ध, संकष्टी अशा बाबतीतही असाच निर्णय घेतला जातो. पूर्वी या सर्व गोष्टी इतक्या व्यापक प्रमाणात सर्वांना समजत नसत. त्यामुळे गावातील जाणकार व्यक्तीने, भटजी - ज्योतिषी - पुरोहित - पुजारी यांनी सांगितलेले सर्वजण ऐकत असत.
भाद्रपदातील गणेश चतुर्थी हे पार्थिव गणेशपूजनाचे व्रत आहे. पार्थिव मूर्ती म्हणजे मातीची मूर्ती ! त्यामुळे चॉकलेट, भाज्या, फुले, नारळ, भांडी, वाद्ये, फळे, कागदाचा लगदा इत्यादींच्या केलेल्या मूर्ती पुजणे हे धर्माला धरून नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे हे व्रतच मुळी चतुर्थीच्या एका दिवसाच्या ४ व रात्रीचा १ असे ५ प्रहरांचे व्रत आहे. या बरोबरच आणखी एक अशीही मान्यता आहे की मातीच्या मूर्तीत केलेली प्राणप्रतिष्ठा, जीवत्व हे एकच दिवस राहते. त्यामुळे ही पूजा, व्रत हे फक्त एकच दिवसासाठी करण्याचे आहे. आता चतुर्थी कधी, किती वाजता लागते, कधी संपते ही माहिती, पूर्वी खेडोपाडी पसरलेल्या गणेश भक्तांपर्यंत कशी पोचणार ? यावर दीड दिवस हा सोपा व अचूक पर्याय आहे. गणपती बसवून दीड दिवस संपला म्हणजे चतुर्थी नक्की संपली. म्हणजेच विसर्जन करायला हरकत नाही. म्हणून हे दीड दिवस अशा विचित्र वाटणाऱ्या मुदतीचे गणेश व्रत सुरू झाले.
गणपती हा दीड दिवसाचा का, याचे हे उत्तर मात्र महत्वाचे आहे !
कर्नाटकातील अर्ध्या गणपतीची मूर्ती ---
उत्तर कन्नडमधील बनवासी ही प्राचीन कर्नाटकाची राजधानी होती. येथे कदंब कुलातील राजांची सत्ता होती. बनवासी हे काशी वाराणसी क्षेत्रा इतकेच प्राचीन आहे. याला दक्षिणेची काशी असे म्हणतात. येथे एक मधुकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर कदंब कुळातील राजा मयूर शर्मा याने बांधले आहे. ते १५०० वर्षांपूर्वींचे असून कर्नाटकातील सर्वात जुन्या देवळांपैकी एक देऊळ आहे. इतर ठिकाणी अत्यंत क्रुद्धमुद्रेत दिसणारा नृसिंह येथे मात्र चक्क शांत व प्रसन्न मुद्रेत पाहायला मिळतो. ऐरावतावर विराजमान असलेली इंद्र आणि शची यांची दुर्मिळ मूर्ती येथे पाहायला मिळते.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे एक गणेश मंदिर असून येथील गणेश मूर्ती ही अर्धीच आहे. वास्तविक एखादी मूर्ती भंगली तर ते अशुभ मानून अशा मूर्तीचे तात्काळ विसर्जन केले जाते. परंतु येथे मात्र या अर्ध्याच मूर्तीची रोज वर्षानुवर्षे यथासांग पूजा केली जाते. या मूर्तीच्यावर थेट अभिषेक होईल असे एक तांब्याचे अभिषेक पात्र टांगलेले असून अभिषेकानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठी शिवपिंडीप्रमाणे व्यवस्था आहे. या मूर्तीचा उरलेला अर्धा भाग हा मूळ काशी शहरामध्ये आहे असे सांगितले जाते. पण मूर्तीचा बहुतांश येथेच भाग आहे. त्यामुळे उरलेला अर्धा भाग काशी नगरीत सापडणे अशक्य आहे असे वाटते.
संपर्क : makarandsk@gmail.com