काल दिवसभरात पाहिलेल्या शेकडो फोटोपैकी सर्वात जास्त आवडलेला हा फोटो. पु.लं.च्या ठेंगण्या सुबक मोदकाच्या वर्णनाला साजेसा! केळीच्या हिरव्यागार पानावर विराजमान झालेली मोदकाची ठाशीव मूर्ती बाप्पाची प्रतिकृती वाटते.
मोदकाची पांढरी शुभ्र ओलावलेली कांती, भरीव बांधा, कळीदार नाक वरून साजूक तुपाची धार बस्स, एवढा शृंगार पुरेसा आहे. पानफुलांची, सुका मेव्याची सजावट, मोदकाच्या शेंड्यावर केशर काडीची पेरणी करण्याची गरजच नाही. केलीत तरी त्याकडे कोणाचं लक्षही जात नाही. कारण, सेंटर ऑफ अँट्रक्शन असतो, तो म्हणजे मोदक. तो नीट जमला म्हणजे कोणत्याही अन्नपूर्णेचा जन्म सुफळ संपूर्ण!
मोदक शिकण्यात कोणाची हयात निघून जाते, तर कोणी पहिल्या प्रयत्नात गड सर करतात. साच्यात घालूनही हवा तसा मोदक बाहेर पडेल याची शाश्वती नाही आणि निघालाच, तरी त्याची कृत्रिमता लपत नाही. मोदकाच्या पारीची उकड काढून पातळ पारी, रेखीव कळ्या आणि छोटुसं नाक काढण्यात खरा मोद अर्थात आनंद दडलेला आहे. त्यात गूळ खोबऱ्याचं सारणही मिळून आलेलं असावं. ना मिट्ट गोड, ना कमी गोड. तोंडात घोळेल, इतपत गोड!
मात्र, परीक्षा तिथे संपत नाही. मोदकपात्रातून मोदक सही सलामत बाहेर पडेपर्यंत नवशीक्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो. कोणी अति घामाने फुटतो, कोणी जीव गुदमरल्यासारखा चिरकतो, कोणाचं बुड चिकटून राहतं, कोणी बाहेर येताना गळपटतो. केल्या मेहनतीचं चीज म्हणून दहापैकी एखादाच सरळसोट बाहेर येतो आणि अन्नपूर्णेला आनंद देतो. मात्र, ती हार न मानता तळहाताला तेलपाण्याचं बोट लावून नव्या दमाने मोदक करते. सरतेशेवटी सुबक, सुंदर मोदक बाप्पाच्या आणि घरच्यांच्या पानात वाढून फसलेले, हसलेले मोदक स्वतःच्या पानात वाढून घेण्यात आनंद मानते. कधी कधी तर करणाऱ्यांना तो खाण्याची संधी मिळतेच असे नाही, तरी खाण्यापेक्षा खिलवण्यात त्यांना धन्यता वाटते.
थोडक्यात मोदकाची साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होऊन सर्वांनाच आनंद देते.