निदान महाराष्ट्रात तरी कोणा मुलांनी आरतीची पुस्तकं घेऊन आरती पाठ केली असेल असे ऐकिवात नाही. गणेशोत्सव मंडळात जाऊन मराठी, अमराठी मुलांच्या दहा बारा आरत्या सहज मुखोद्गत होतात. एवढेच काय तर सगळ्यांबरोबर मंत्रपुष्पांजलीच्या वेळी ओठ हलवता हलवता ते अवघड शब्दही जिभेवरदेखील रुळतात आणि सगळे एकसुराने, एकदिलाने आरती, मंत्रपुष्पांजली, जयघोष करून गणेशोत्सव गाजवतात.
यात आरतीचा अर्थ कळण्यास सोपा आहे, कारण आरती मराठीत लिहिलेली आहे. पण अनेकांना मंत्रपुष्पांजलीचा अर्थ माहीत नसतो. मग ती नुसती पुटपुटण्यापेक्षा समजून उमजून म्हटली तर आपला आनंद निश्चितच द्विगुणित होईल. यासाठी प्रकाश भिडे गुरुजी सांगत आहेत मंत्र पुष्पांजलीचा शब्दार्थ...
१. मंत्रपुष्पांजली शब्दार्थ :
मंत्रपुष्पांजली कुबेराला उद्देशून आहे. महाराष्ट्रात जास्त प्रचलित असलेली, आरती नंतर मंत्रपुष्पांजलीची प्रथा जाणीवपूर्वक आणली असावी.ही प्रथा कुणी, कशासाठी कधी सुरु केली हे प्रश्न अनुत्तरीच राहिले असले तरी, सर्वांसाठी सुशासित राज्याची प्रार्थना या मंत्रपुष्पांजलीतून व्यक्त होते. आपण मंत्रपुष्पांजलीची मूळ ऋचा आणि तिचा शब्दार्थ पहाण्याचा प्रयत्न करु...
मूळ ऋचा :
यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्| ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:| (ऋग्वेद मंडल १.ऋचा१६४)
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे| स मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु| कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम:| (तैत्तरीय आरण्यक अनुवाक ३१मंत्र ६)
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी| स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति| (ऐतरेय ब्राह्मण पंचिका कांड ११)
तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे| आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति|(ऐतरेय ब्राह्मण पंचिका ८ कांड २९)
२.मंत्रपुष्पांजली शब्दार्थ -
देवांनी यज्ञाद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले यज्ञ व तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधि होते जिथे पूर्वी देवता निवास करीत असत (स्वर्ग) ते स्थान, महानता, (गौरव) यज्ञ करुन साधकांनी प्राप्त करुन घेतले. आम्हाला सर्व काही अनुकूल (प्रसह्य) घडवून आणणा-या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आमचा नमस्कार असो. तो कामेश्वर कुबेर माझ्या सर्व कामना पूर्ण करो.आमचे राज्य सर्वार्थाने कल्याणकारी असावे.आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे.आमचे राज्य आसक्ति,लोभ रहित असावे.अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी. आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असावे.समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्धवर्ष पर्यंत सुरक्षित राहो.
याकारणास्तव अशा राजाच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र, मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुत गणांनी परिवेष्टीत केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.
वरील अर्थ पाहता आपल्या पूर्वजांनी समष्टीसाठी केलेली ही प्रार्थना आपल्या धर्माबद्दल, सांस्कृतीबद्दल, परंपरांबद्दल अभिमान दुणावणारी आहे, नाही का?