>> मयुरेश महेंद्र दिक्षित
आपल्या हिंदू धर्माचे वैशिष्ट्यच असे आहे की , आपल्याकडे अनंत देवता आहेत आणि त्यातही ज्याला ज्या देवतेचे रूप भावते त्याने त्या देवतेची उपासना करावी. पण कलियुगात दोन देवांच्या उपासनेला अंत्यंतीक महत्व आहे. 'कलौ चण्डी विनायकौ' या पैकी चंण्डी म्हणजे मातृका व गणेश म्हणजे अक्षर ब्रह्म होय. अनादि काळापासुन या दोघांचीही उपासना मुर्ती रूपात अनवरत चालत आलेली दिसुन येते. पृथ्वीवरील पाचही खंडात गणेश व मातृदेवतांच्या मुर्ती आणि मंदिरांचे अस्तित्व इतिहास व वर्तमानात दिसुन येते.
चंण्डी म्हणजे सतत आपल्या प्रेम आणि क्रोध रूपात कर्म व धर्माचा दृढ संदेश देणारी शक्ती.सृष्टिच्या रक्षणार्थ स्वताःच्या पतीला सुद्धा आपल्या जीने पायाखाली घेतल अणि सृष्टीला मातृत्व व दाइत्वाचा संदेश दिला ती म्हणजेच महाचण्डि.
आपल्या चतुर बुद्धीने सतत सृष्टीच्या हिताचे कर्म करणारे, आपल्या मातेच्या मनात आलेल्या गृहस्थाश्रमाच्या चिंतेचे विघ्न हरण करण्या साठी गौतम ॠषींना तप करण्यास गौ हत्येचे कारण निर्माण करून प्रभु श्री त्र्यंबकराजांच्या जटेतील गंगा सृष्टीच्या उद्धारासाठी मृत्युलोकात अवतरीत करण्यास भागपाडणारे प्रमुख नायक ते म्हणजेच श्री गणेशाचे प्रसिद्ध रुप विनायक होय.
विनयती अनुशास्ति विनायकः अर्थात जो अनुशासन करतो, जो सदुपदेश देतो आणि कर्तव्याकर्तव्याच विवेचन करतो.
ऋग्वेदाच्या दुसर्या मंडलात तेविसाव्या सुक्तातील ऋचा ब्रह्मणस्पतिची स्तुती गणपति अशा संज्ञेने वेदवाणी करते. गणांचा अधिपती तो गणपति!
"ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कविनामुपश्रवस्तमम् ।ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतऽआ नः शृण्वत्रुतिभीः सीदसादनम्।।
अर्थात हे ब्रह्मणस्पति तु जन-गणांचा पालनकर्ता आहेस, सर्व ज्ञानीयांमध्ये श्रेष्ठ आहेस , किर्तीमान देवांमध्ये अग्रणी आहेस, तु जेष्ठराज आहेस व स्तुतीपरक सुक्तांचा अधिपती आहेस, मी तुझ हवनाद्वारे आवाहन करतो, माझी प्रार्थना श्रवण कर मझ्या संरक्षणासाठी विराजमान हो.
वेद हे इश्वराचे चक्षु आहेत आणि त्या चक्षुतुन अनुभूतींच्या रसरूप आत्मज्ञानाची अनुभुती देणारे अश्रु ही उपनिषदे आहेत. त्यात गणपतीची चार उपनिषदे आहेत. गणपति अथर्वशीर्ष उपनिषद हे श्री गणेशा विषयक सर्व श्रेष्ठ उपनिषद आहे.प्रथम चरणात या उपनिषदात गणपतीला नमस्कारा पासुन ते सर्वतो मां पाही पाही संमंतात पर्यंत अथर्वशीर्षाचे कवच सांगीतले आहे. त्यानंतर उपास्य देवतेची स्तुती केलेली आहे. श्री गणराजाला सर्व वेदादी वाङ्मय, चिन्मय, आनंदमय , ब्रह्ममय, सच्चिदानंद,अद्वितीय परमात्मा इत्यादींनी संबोधले आहे.
या उपनिषदांत नाद,बिंदु, मकार,आकार, ऊकार द्वारे गणेशाच्या मुळ ॐकार स्वरूप व सगुण स्वरूपाच्या वर्णना सोबत वैदिक संस्कृतीचे मुळ सैषा गणेश विद्या व गणेश गायत्रीचा पण समावेश आहे . गण शब्दाचा आधिपती गकार पहिले उच्चारावा मग आदि वर्ण आकाराचे उच्चारण करावे , त्या नंतर नाद बिंदु अनुस्वार उच्चारावा . त्या नंतर अर्धचंद्राने सुशोभित गं ला ओंकाराने हृद्ध करावे, म्हणजे गं च्या आधि व नंतर ॐकार चा उच्चार असावा , त्या मातृकांचे दिव्य मंत्रात रूपांतर होइल व मंत्र बनेल ॐ गं ॐ गकार पुर्व रूप आहे , अकार मध्यरूप ,अनुस्वार अंत्यरूप तर बिंदु हे उत्तर रुप आहे व नाद संधान आणि संहिता संधि आहे
हेरंभोपनिषद् या उपनिषदांत हेरंभ गणपतिच्या उपासनेद्वारे आत्म विद्येची प्राप्ती कशी होते ह्यावर चर्चा आहे. गणेश पुर्व तापिनी उपनिषद हे तीन भागात विभाजीत आहे , त्या प्रत्येक भागाला उपनिषद हीच संज्ञा दिली आहे. काही ठीकाणी याच प्रथमो,द्वितीयो, तृतीयोपनिषदांना ब्रह्मोपनिषद् म्हणुन ओळखले जाते, प्रथमोउपनिषद हे सृष्टिकर्ता प्रजापती संबधीत ज्ञानाशी निगडित आहे . द्वितीयोपनिषदात गणपतिच्या ध्यान,मंत्र आणि यंत्राची माहीती दिलेली आहे.तर तृतीयोपनिषदात गणपतिची प्रतिकात्मकता व उपासनेद्वारे प्राप्त होणार्या फळांचे वर्णन कलेले आहे .
गणेश उत्तरतापिनी उपनिषद हे सहा खंडात आहे. प्रथम खंडात गणपति आणि ओंकार हे एकच असल्याची व्याख्या केलेली आहे .व जागृती , स्वप्न , सुषुप्ति व तुर्यावस्था या चारही अवस्था म्हणजे ओंकार रूप गणपति स्वरूपाच्या साडेतीन मात्रा आहेत अशीही व्याख्या आढळते.
गणेशाचे प्रथमरूप ॐकार आहे. ॐकार हा विश्वाचा बीज,वेदबीज व मंत्रबीज आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पुढील ओवीत विश्ववंद्य,आदीबीज, प्रणवरूप श्रीगणेशाचे मंगलाचरण करतात.
ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।जयजय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥
ज्ञानेश्वरी म्हणजे ईश्वर संवादी व शास्त्रसंवादी संतहृदयातून प्रकट झालेले स्वर्गीय संगीत आहे. दासबोधात सुद्धा समर्थ रामदासांनी परब्रह्म स्वरूप श्री गणेशाचे चिंतन केलेले आढळते. देवा तूचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु...
दुसर्या भागात गणपती हा महानाद आहे . ॐ काराच्या नादाशी तो समरस आहे. गणपती हा शब्दब्रह्म आहे असे निर्देशशिले आहे. तिसर्या खंडात गणपती हा शक्तियुक्त आहे, त्याचे गज मुख आहे व सृष्टीच्या निर्मितीचा क्रम गणपतींच्या अवसवातुन कसा झाला आहे हे दर्शविले आहे. चौथ्या भागात सांख्य योग दर्शन व वेदांन्त विचारांचा संयोग दर्शविला आहे. पाचव्या भागात रूद्राने सर्व देवांना निचृद् गायत्री छंदातील गणेश गायत्री मंत्राचे महत्व सांगितले आहे
एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही । तन्नो दंती प्रचोदयात्
विद्वानांनी एक शब्दाचा अर्थ माया म्हणुन विचारात घेतला आहे आणि दंत चा अर्थ दमन करणारा म्हणजे एक दंताय चा अर्थ झाला माये चे हरण ( दमन ) करणारी देवता . तसेच वक्र चा अर्थ षडरीपु ( काम, क्रोध,लोभ,मोह,मद , मत्सर ) म्हणून घेतला आहे व तुंड चा अर्थ नियंत्रण करणारा . याच प्रकारे वक्रतुंडाय धीमही चा अर्थ होतो या षडरीपू रूपी मायेला नियंत्रण बद्ध ठेवणार्या देवतेचे आम्ही ध्यान करतो. सहाव्या खंडात ऐहिक व पारलौकीक सुख प्राप्त करून देणारे कर्मकाण्डीय प्रयोगांची ओळख करून दिलेली आढळते.
(अधिक माहितीसाठी 'गूढ त्रिशुंड गणेशाचे' हा ग्रंथ जरूर वाचावा. यामध्ये विविध क्षेत्रातील विद्वानांचे लेख आहेत.)