बाप्पा आणि त्याचे गुणगान करणारी गाणी, स्तोत्रं, रचना, कविता सारे काही गोड गोड आणि मंगलच! कोणतेही गीत पुष्प घ्यावे, हुंगावे आणि गुणगुणत राहावे. आजपासून भाद्रपद महिना सुरू झाला. त्याबरोबर बाप्पाची गाणी नकळत ओठावर चढली असतीलच. घरोघरी बाप्पाच्या आगमनाची आतुरताही लागली असेल. अशात मंगळवारी भाद्रपद मास सुरू होत आहे, म्हणजे शुभ शकुनच! अशा सुमुहूर्तावर बाप्पाकडे काय मागावे अशा विचारात असाल, तर अष्टविनायक चित्रपटातले पं. वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या स्वरातले, गीतकार मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेले आणि संगीतकार अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेले 'तू सुखकर्ता तू दुःखहर्ता' या गीताने बाप्पामय सुरुवात करता येईल.
तू सुखकर्ता तू दुःखहर्तातूच कर्ता आणि करविता।
मी करतो, माझ्यामुळे सगळं घडत आहे, मी जबाबदार आहे अशा मी पणाचा भार एक ना एक दिवस असह्य होतो. तो भार घेण्यापेक्षा बाप्पा हाच कर्ता आणि करविता आहे, हे ध्यानात ठेवले की मी पणाचा लवलेश उरत नाही. आपण केवळ निमित्तमात्र आहोत या विचाराने कार्यशील राहतो आणि आकाशाला हात लागले तरी आपले पाय जमीन सोडत नाहीत. यासाठी आपला सर्व भार त्याच्यावर सोपवावा.
ओंकारा तू, तू अधिनायक,चिंतामणी तू, सिद्धी विनायकमंगलमूर्ती तू भवतारक,सर्वसाक्षी तू अष्टविनायकतुझ्या कृपेचा हात मस्तकी,पायी तव मम चिंता॥
बाप्पा आपल्या पाठीशी असल्यावर भीती कसली? मात्र तेवढा विश्वास आपण संपादन करायला हवा. बाप्पाला काय आवडते? तर मन लावून प्रामाणिकपणे काम करणारी माणसं, मेहनतीला झोकून देणारी माणसं, आई वडिलांचा आदर करणारी माणसं, सतत शिकण्याचा ध्यास बाळगणारी माणसं. अशा लोकांना बाप्पा पावतोच पावतो. तो सिद्धी देणारा विशेष नायक डोक्यावर हात ठेवता झाला, की अपयश आल्या पावली घाबरून निघून नाही का जाणार? उरली सुरली चिंता त्याच्या पायाशी अर्पण केली की निश्चितपणे आपण आपल्या ध्येयाचा प्रवास करायला मोकळे. अशा वेळी वाटेत येणारी विघ्ने कोणती? तर...
देवा सरु दे माझे मी पण,तुझ्या दर्शने उजळो जीवननित्य कळावे तुझेच चिंतन,तुझ्या धुळीचे भाळी भूषणसदैव राहो ओठांवरती,तुझीच रे गुण गाथा॥
आपल्या यशाचा शत्रू कोणी असेल तर तो म्हणजे अहंकार! जिथे अहंकार असतो तिथे सरस्वती आणि गणपती थांबत नाहीत. पण थोड्याशा यशाने हुरळून जाणारे आम्ही गर्वाने फुलून जातो. यासाठी गीतकार देवालाच साकडे घालतात, की माझे मी पण सुरू दे आणि तुझे दर्शन घडून जीवन उजळू दे. तू दिलेले कार्य करणे हेच आमचे भूषण असू दे आणि सत्य ओठी राहून तुझे चिंतन घडू दे!
असे सुंदर मागणे बाप्पाकडे मागितले तर तो कशाला बरे नकार देईल? डोळ्यांनी कृपादृष्टीचा वर्षाव करत तो आपल्याला नक्कीच तथास्तु म्हणेल आणि आपले जीवन मंगलमय करेल. एकमनाने, एकदिलाने म्हणा... मंगलमूर्ती मोरया!